रविराज वि. पाटील
गारगोटी : घराचा कर्ता हजारो किलोमीटर दूर आखातातील वाळवंटात कष्ट करत असताना गावातील प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर सध्या काळजीची सावली दाटली आहे. फोनची प्रत्येक घंटा हृदयाचे ठोके वाढवते; तर युद्धासंदर्भातील प्रत्येक ‘बेकिंग’ बातमी डोळ्यांत नकळत अश्रू आणते. अनफ मुस्लिम वस्तीतील सुमारे पाचशे कष्टकरी बांधव अरब देशांत सुखरूप असले तरी युद्धाच्या सावटामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. शांतता नांदावी आणि आपल्या माणसांचे रक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक ओठावर सध्या एकच दुवा आहे.
अनफ बुद्रुक, अनफ खुर्द आणि अनफवाडी (ता. भुदरगड) येथील अनेक तरुण व कुटुंबप्रमुख दुबई, सौदी, कुवेत, कतार अशा देशांत नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक आहेत. चालक, घरकाम, बागकाम यांसारखी छोटी-मोठी कामे करतानाच अनेकजण विविध कंपन्यांत नोकरी करून आपल्या संसाराचा गाडा प्रामाणिकपणे पुढे नेत आहेत. त्यांच्या कष्टावरच घरातील चूल पेटते, मुलांचे शिक्षण सुरू आहे आणि कुटुंबांची स्वप्ने उभी आहेत. मात्र अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनफ वस्तीतील वातावरण चिंतेने व्यापले आहे. मोबाईलवर येणाऱ्या प्रत्येक कॉलकडे डोळे लागलेले... प्रत्येक बातमी ऐकताना हृदयाचे ठोके वाढलेले... अशा अवस्थेत येथे अनेक माता, पत्नी आणि भगिनी दिवस काढत आहेत. माझा मुलगा सुरक्षित असावा, माझा पती सुखरूप परत यावा, माझा भाऊ संकटातून दूर राहावा... या एकाच भावनेने त्यांच्या ओठांवर सतत प्रार्थनेचे शब्द आहेत. काहींच्या डोळ्यांत अश्रू दाटतात, तर काही जण धीर देत स्वतःलाच सावरत आहेत.
रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने मशिदींमध्ये विशेष दुवा करण्यात येत आहे. युद्ध थांबावे, शांतता प्रस्थापित व्हावी आणि सर्वत्र सलोखा नांदावा, अशी सामूहिक प्रार्थना गावकरी करत आहेत. सीमापारच्या संघर्षाची झळ गावातील छोट्याशा वस्तीलाही कशी पोहोचते, याचे जिवंत चित्र सध्या अनफ परिसरात दिसत आहे. आशेचा किरण मात्र कायम आहे. आपली माणसं सुखरूप आहेत, या विश्वासावरच कुटुंबीयांचा संसार उभा आहे. युद्धाच्या ढगांमागे शांततेचा सूर्य पुन्हा उगवेल आणि परदेशातील आपल्या लेकरांचे हसरे चेहरे पुन्हा प्रत्यक्ष पाहायला मिळतील, या आशेने संपूर्ण अनफ वस्ती परमेश्वराकडे मनोमन प्रार्थना करत आहे.
काळजी, प्रतीक्षा आणि धाकधूक
अनफ खुर्द येथील मुबारक शेख यांची दोन्ही मुले तसेच भावांची तीन मुले दुबईत रोजगारानिमित्त आहेत; तर अनफवाडी येथील हसन शेख यांची दोन्ही मुले, मुलगी सायमा आणि भाचा आरिफ शारजा येथे आहेत. अशीच काळजीमिश्रित प्रतीक्षा आणि धाकधूक सध्या अनफ वस्तीतील प्रत्येक कुटुंबाच्या मनात घर करून बसली आहे.