Isha Desai Accident Case
ईशा जनार्दन देसाई Pudhari File Photo
कोल्हापूर

ईशाची मृत्यूची झुंज अखेर थांबली

पुढारी वृत्तसेवा

कसबा बावडा : मराठा कॉलनी कसबा बावडा येथील युवती ईशा जनार्दन देसाई हिने अथक प्रयत्नातून नीट परीक्षेत चांगले मार्क मिळवले होते. तिला डॉक्टर व्हायचे होते. त्या द़ृष्टीने प्रवेशाची प्रक्रिया कुटुंबीयांकडून सुरू होती. 15 जून रोजी भरधाव मोटारीने तिला उडवले, डोक्याला मार लागल्याने तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दहा दिवस तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. ती अखेर 26 जून रोजी थांबली. परत येते म्हणून सांगून गेलेली लेक घरी परतलीच नाही, त्यामुळे आई-वडील, बहिणीसह कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे.

रुग्णालयात गेले दहा दिवस उपचार

मराठा कॉलनी कसबा बावडा येथे राहणार्‍या जनार्दन देसाई आपली पत्नी व मुलींसह राहतात. 15 जून रोजी दुपारी त्यांची मुलगी ईशा ड्रेस अल्टर करण्यासाठी कसबा बावडा भोसलेवाडी मार्गावर एका टेलरकडे गेली होती. ड्रेस देऊन ती आपली दुचाकी रस्त्या कडेला उभी करून फोनवर बोलत होती. दुपारी पावणेदोनच्या सुमारास कसबा बावड्याकडून भोसलेवाडीकडे जाणार्‍या भरधाव मोटारीने तिला जोराची धडक दिली, ती उडून मोटारीच्या बोनेटवर आदळली. यामध्ये तिच्या डोक्याला जोरदार मार लागला. उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या डोक्याला मार लागला होता. मेंदूला जखम झाल्यामुळे तिच्यावर खासगी रुग्णालयात गेले दहा दिवस उपचार सुरू होते. तिची प्रकृती सुधारेल, अशी आस लावून आई-वडील बसले होते, येणार्‍या प्रत्येकाला ते भावनाविवश होऊन अपघाताबाबत सांगत होते. अतिदक्षता विभागामध्ये मुलीवर उपचार होत असल्यामुळे मिनिटामिनिटाला त्यांच्या जीवाची घालमेल होताना दिसत होती.

अपघात की घातपात....

ईशा आपली दुचाकी रस्त्याकडेला पार्क करून फोनवर बोलत होती. ज्या मोटारीने तिला उडवले ती मोटार दोन मिनिटांपूर्वी विरुद्ध दिशेने कसबा बावड्याकडे गेली होती. तीच मोटार दोन मिनिटांनी परत आली आणि ईशाच्या दुचाकीला जोराची धडक दिली. आमचे कोणाशी वैर नाही, कोणाशी कसलेही भांडण नाही. एकूणच घटनाक्रम पाहता हा अपघात आहे की घातपात आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा ईशाचे हाताश वडील जनार्दन देसाई यांनी दै ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली.

SCROLL FOR NEXT