निगवे खालसा : भरधाव मोटार झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला. महेश दगडू सुतार (वय 30, रा. साके, ता. कागल) असे मृत चालकाचे नाव असून अजित मारुती जाधव (42, रा. बाचणी, ता. कागल) जखमी आहेत. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास कोल्हापूर-गारगोटी राज्य मार्गावर इस्पुर्लीजवळ हा अपघात झाला. अपघाताची नोंद इस्पुर्ली पोलिस ठाण्यात झाली आहे.
महेश सुतार हे मोटार चालवत होते. भरधाव असल्याने त्यांचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. सुतार यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. जाधव जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार जाधव तपास करीत आहेत.