कोल्‍हापूर : उपसाबंदी शिथिल करावी, या मागणीसाठी इरिगेशन फेडरेशनतर्फे सिंचनभवन कार्यालयाच्‍या मुख्‍य दरवाजात ठिय्‍या आंदोलन केले.  (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

Irrigation Federation Protest | सिंचन भवनमध्‍ये शेतकऱ्यांचा पाच तास ठिय्‍या

शिथिल केलेली उपसाबंदी पुन्‍हा लागू केल्‍याने संताप : आजपासून झुणका भाकर घेऊन ठिय्‍या; इरिगेशन फेडरेशनचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : शिथिल केलेली उपसाबंदी सहा तासांत पुन्‍हा लागू केल्‍याच्‍या निषेधार्थ महाराष्‍ट्र इरिगेशन फेडरेशनतर्फे बुधवारी सिंचन भवनमध्‍ये पाच तास ठिय्‍या आंदोलन केले. आंदोलकांनी सिंचन भवन कार्यालयाच्‍या व्‍हरांड्यासमोरच ठिय्‍या मारून जोरदार घोषणाबाजी केली. गुरुवारी सकाळी दहापर्यंत उपसाबंदी शिथिल न केल्‍यास अकरा वाजल्‍यापासून झुणका भाकर घेऊन ठिय्‍या आंदोलन करण्‍याचा इशारा दिला.

आ. चंद्रदीप नरके, माजी आमदार उल्‍हास पाटील यांनी आंदोलनस्‍थळी भेट देऊन अधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्‍योती देवकर यांना आंदोलकांनी धारेवर धरले. आंदोलकांशी चर्चा करून शिथिल केलेली उपसाबंदी रात्री उशिरा आदेश काढून पुन्‍हा का लागू केली? असा संतप्‍त सवाल आंदोलकांनी केला. जिल्‍ह्यातील पाणीसाठा स्‍थितीचा अहवाल तातडीने जलसंपदा विभाग मुख्‍य सचिवांना पाठविण्‍यास भाग पाडले. यावेळी त्‍यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्‍यासह कृष्‍णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक धुमाळ, प्रधान सचिव एकनाथ डवाले यांच्‍याशी मोबाईलवरून संपर्क साधून उपसाबंदी शिथिल करण्‍याची मागणी केली. जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे-पाटील यांनाही मोबाईलद्वारे संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, दिल्‍लीत असल्‍याने संपर्क होऊ शकला नाही. मुंबईतून आदेश येताच उपसाबंदी शिथिल करू, असे आश्‍वासन देत आंदोलन स्‍थगित करण्‍याची अधिकार्‍यांनी विनंती केली. गुरुवारी सकाळी दहापर्यंत निर्णय न झाल्‍यास पुन्‍हा आंदोलन करू, असा इशारा देत आंदोलन स्‍थगित केले.

यावेळी विक्रांत पाटील-किणीकर, राजेंद्र सूर्यवंशी, प्रदीपकुमार पाटील, रूपेश पाटील, शिवाजी माने, शरद पाटील, बाबासाहेब देवकर, भारत पाटील-भुयेकर, चंद्रकांत पाटील-पाडळीकर, मारुती पाटील यांच्‍यासह कोल्‍हापूर, सांगली जिल्‍ह्यांतील पाणीपुरवठा संस्था प्रतिनिधी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलन स्‍थगित करण्‍यावरून वाद

आंदोलन स्‍थगित करण्‍यावरून आंदोलकांमध्‍येच शाब्दिक वाद झाला. काही कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आजच निर्णय घ्‍या, अन्‍यथा आंदोलन सुरू ठेवा, असा आग्रह धरल्‍याने आमदार नरके यांच्‍यासह प्रमुख पदाधिकार्‍यांची पंचाईत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT