कोल्हापूर : गोकुळ संलग्न ‘त्या’ 1200 दूध संस्था अवसायनात काढण्याच्या कारवाईमागे अद़ृश्य शक्तीचा हात आहे. निवडणुकीतून या संस्था अपात्र ठरविण्याचा त्यांचा कट आहे; पण कोणत्याही परिस्थितीत हा कट हाणून पाडणार आहे. दूध संस्थांमागे गोकुळ हिमालयाप्रमाणे राहील. एकाही संस्थेचा मतदानाचा हक्क हिसकावून घेऊ देणार नाही, असे आश्वासन गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी दूध संस्था प्रतिनिधींना दिले.
अवसायन कारवाईतील 1200 दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी रविवारी (दि.29) गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात चेअरमन मुश्रीफ यांच्यासह संचालकांची भेट घेतली. या प्रकरणाची जबाबदारी गोकुळने घ्यावी व दूध संस्थांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवून न्याय द्यावा, या मागणीचे निवेदन दिले. संस्था प्रतिनिधी विद्याधर कुलकर्णी म्हणाले, अवसायन प्रक्रियेतील दूध संस्थांची एका दिवसात सुनावणी घेणे शक्य आहे. सुनावणीमध्ये पात्र ठरतील त्याच संस्था यादीत घ्याव्यात. चेअरमन, संचालकांनी दूध संस्थांच्या पाठीशी राहावे.
सिद्धनेर्लीचे विलास पोवार म्हणाले, अनंत संकटातून दूध संस्था उभा राहिल्या. संकलन, ऑडिट, निवडणूक होऊनही संस्था अवसायनात निघाल्या आहेत. याची गोकुळ काही जबाबदारी घेणार आहे का, असे विचारत एकही संस्था मतदानापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्या, असे सांगितले. कौलवचे केरबा पाटील यांनी संस्था गोकुळसोबत आहेत. गोकुळनेही संस्थांच्या पाठीशी राहावे. याप्रकरणी संचालक मंडळाने कधीही हाक मारावी, दूध संस्था हजर असतील, असा विश्वास दिला.
यावेळी संचालक विश्वास पाटील, बाबासो चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, बयाजी शेळके, किसन चौगले, युवराज पाटील, अमरसिंह पाटील, अभिजित तायशेटे, अजित नरके, प्रकाश पाटील आदींसह अन्य संचालक उपस्थित होते.
‘त्या’ अद़ृश्य शक्तीचा शोध घ्या
तक्रार देणारी व्यक्ती कोण, याच्यामागे राजकीय वास येत आहे. गोकुळने संस्थांना मतदानास पात्र ठरवून या अद़ृश्य शक्तीचा शोध घ्यावा, अशी मागणी संस्था प्रतिनिधी युवराज पाटील यांनी केली.