A.S. Traders scam Pudhari Photo
कोल्हापूर

A.S. Traders scam: गुंतवणूकदार भिकेकंगाल; एजंट मालामाल!

ए. एस. ट्रेडर्स घोटाळा; 48 एजंटांवर कमिशनपोटी 146 कोटींची खैरात

पुढारी वृत्तसेवा
दिलीप भिसे

कोल्हापूर : दामदुप्पट परतावा, आकर्षक भेटवस्तू अन्‌‍ परदेशी टूर ... श्रीमंतीच्या हव्यासाने पछाडलेल्या गुंतवणूकदारांनी मालमत्ता गहाण, विक्री एव्हाना खासगी सावकारी बोजा माथ्यावर लादून घेऊन लाखो रूपये ए. एस. ट्रेडर्ससह संलग्न कंपन्यांमध्ये गुंतविले. भोंगळ कारभारामुळे कंपनीचा डोलारा पत्त्यासारखा कोसळला. होत्याचे नव्हते झाले. बहुतांशी गुंतवणूकदार भिकेकंगाल बनले. मात्र रॅकेटमधील संचालक, एजंट गडगंज झाले, मालामाल बनले. दीड-दोन वर्षात कंपनीच्या 48 एजंटांवर कमिशनपोटी 146 कोटींची खैरात करण्यात आली.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह 7 राज्यात विखुरलेल्या आणि कोट्यवधीची उलाढाल झालेल्या शाहूपुरी येथील बहुचर्चित ए.एस. ट्रेडर्स ॲड डेव्हलपर्ससह संलग्न कंपन्यांमध्ये अडीच हजार कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा होऊनही तपास यंत्रणेला फारसे सोयरसुतक राहिल्याचे दिसून येत नाही. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेले लाखाहून जादा गुंतवणूकदार रस्त्यावर येऊनही कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी घोटाळ्याकडे कानाडोळा केल्याचे चित्र आहे. त्याचाच फायदा घेत संशयितांनी स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले आहे.

एल.एल.पी.कंपनीविरोधी कृती समितीने ए.एस. ट्रेडर्ससह संलग्न कंपन्यामधील कोट्यवधीच्या गैरव्यवहाराबाबत पोलिस महासंचालक, विशेष महानिरीक्षक व पोलिस अधीक्षकांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. गैरव्यवहाराचे पुरावे सादर केले. वरिष्ठस्तरावर आदेश होतात. स्थानिक पातळीवर मात्र कासवाच्या गतीने तपासाची प्रक्रिया सुरू आहे. चौकशीत दोषी आढळलेले अनेक मातब्बर एजंट आजही उजळ माथ्याने वावरत आहेत. त्यात कोल्हापूरसह सांगलीतील काही माजी नगरसेवक, व्यावसायिक, उद्योजकांचाही समावेश आहे. संबंधितांवर पोलिस यंत्रणेकडून का कारवाई होत नाही, हा गुंतवणूकदारांचा सवाल आहे.

ए. एस. ट्रेडर्स ॲण्ड डेव्हलपर्ससह संलग्न कंपन्यामध्ये एजंट म्हणून काम करणाऱ्या 48 एजंटांवर दोन वर्षांत कमिशनपोटी तब्बल 146 कोटींची खैरात करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कृती समितीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणला आहे. त्यामध्ये कोल्हापुरातील दोन माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. त्यापैकी एकाला 3 कोटी 79 लाख तर दुसऱ्याला 2 कोटी 13 लाखांचा कमिशनपोटी मोबदला मिळाला आहे. विशेष म्हणजे तपास यंत्रणेने संबंधितांची साधी चौकशीही केली नाही, हे विशेष. हाच पैसा आगामी महापालिकेच्या निवडणुकीत उधळला जातो की काय? अशी गुंतवणूकदारांत चर्चा आहे.

32 संचालकांसह प्रमुख 25 एजंटांची बँक खाती गोठविली

कोट्यवधीच्या घोटाळ्यातील बहुचर्चित ए. एस. ट्रेडर्स ॲण्ड डेव्हलपर्ससह संलग्न कंपन्यांचा म्होरक्या तथा मॅनेजिंग डायरेक्टर लोहितसिंग सुभेदार याच्यासह 32 संचालक आणि कोट्यवधीची उलाढाल केलेल्या प्रमुख 25 एजंटांच्या विविध बँकांतील खातीही गोठविण्याची प्रक्रिया तपास यंत्रणेने केली होती. म्होरक्यासह साथीदारांनी फरार काळात नवी मुंबई, वाशीतील अलिशान हॉटेल्स, लॉजेसवर कोट्यवधीची उधळण केल्याची माहितीही चौकशीदरम्यान उघड झाली होती.

अबब... 75 तोळे दागिने अन्‌‍ अडीच लाखाचे हिरे...!

कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी जेरबंद झालेल्या म्होरक्याच्या घटस्फोटित पत्नीची आर्थिक गुन्हे शाखेने सखोल चौकशी केली होती. त्यांच्याकडून 75 तोळे दागिने, अडीच लाखांचे हिरे असा 50 लाखांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT