अनुराधा कदम
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात भोंदूगिरी, बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली घडलेल्या धक्कादायक घटनांनी कायद्याच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कॅन्सरवर उपचार, भूतबाधा काढणे, पुत्रप्राप्तीचा उपाय सांगणे, गुप्तधन मिळवून देणे अशा आमिषांनी नागरिकांना जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक आणि महिलांवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या. मात्र या प्रकरणांमधील तपासाची चाके धीम्या गतीने फिरत आहेत. यामुळे ‘अटक झाली... धिंड काढली, मग पुढची प्रक्रिया कुठे अडली?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काही महिन्यांत कॅन्सर उपचाराच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार करणार्या भोंदूबाबांसह गुप्तधनाच्या आमिषाने लाखोंची लूट करणारे, ‘चुटकीबाबा’सारखे भोंदू, तसेच अघोरी पूजा आणि जादूटोणा करणारे अनेकजण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. काही ठिकाणी पोलिसांनी धिंड काढून कारवाईही केली. मात्र बहुतांशी प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदवून अटक झाली असली तरी तपास, चार्जशीट आणि न्यायालयीन प्रक्रिया या टप्प्यांमध्येच खटले अडकले आहेत.
सुटका जामिनावर, भरला पुन्हा दरबार
गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांमध्येही सुनावणी प्रक्रिया संथ गतीने सुरू असून अंतिम निकालापर्यंत पोहोचण्यासाठी वर्षानुवर्षे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चुटकीबाबा सनी कांबळेसह काही भोंदूबाबा जामिनावर सुटून पुन्हा त्याच ‘दरबारां’च्या माध्यमातून आपले जाळे सक्रिय करत असल्याची माहिती समोर येत आहे.