कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती गुरुवार, दि. 14 रोजी घेण्यात येणार आहेत. अंतिम यादीत पात्र ठरलेल्या पाच जणांचा समावेश असून, आता यामधून विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे प्रभारी कुलगुरू पदाचा पदभार देण्यात आला आहे. पूर्णवेळ कुलगुरूपदासाठी महिना भरापूर्वी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून पाच उमेदवारांची नावे अंतिम मुलाखतीसाठी निश्चित करण्यात आली होती.
होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव, विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, नागपूर विद्यापीठाच्या डॉ. स्मिता देशमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फिजिक्स विभागाचे माजी प्रमुख डॉ. संजय ढोले यांचा अंतिम यादीत समावेश आहे.