कोल्हापूर : अलमट्टी धरणातील पाणीसाठा, त्यातील विसर्ग, याबाबत समन्वयाने नियोजन करण्याचा निर्णय मंगळवारी सायंकाळी झालेल्या आंतरराज्य बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटकातील बेळगाव आणि विजापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी या बैठकीत ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.
पावसाळ्यातील संभाव्य पाणीसाठा, त्याचा विसर्ग आणि पूरस्थिती यासह अलमट्टी धरणाची पाणी पातळी 15 ऑगस्टपर्यंत 517 मीटर ते 517.50 मीटरपर्यंत ठेवणे, हिप्परगी बंधार्याचे दरवाजे पूरकाळात पूर्णपणे खुले ठेवणे या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली. पावसाळ्याच्या कालावधीत दोन्ही राज्यांतील धरणांतील पाणीसाठ्याची पातळी, विसर्ग याबाबतची माहिती वेळेवर एकमेकांना दिली जाईल. पूरस्थितीत चारही जिल्ह्यांच्या यंत्रणा समन्वयाने काम करतील, असेही निर्णय यावेळी घेण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत गेल्या काही वर्षांत आलेल्या पूरस्थितीचा अनुभव लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी अधिक काटेकोर नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
अलमट्टी धरणातील पाणी समन्वयाने सोडा. पाणीसाठा मर्यादित ठेवा, त्याद्वारे पूरस्थिती नियंत्रणात ठेवा, असे सांगत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दि. 29 मे रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिव समितीची बैठक होत आहे. या बैठकीत जे जे निर्णय होतील, अलमट्टी धरणातील पाणी पातळीचे जे वेळापत्रक निश्चित होईल, त्याचे पालन करावे, असे आवाहन केले. या बैठकीला सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे, बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, विजापूरचे जिल्हाधिकारी संबित मिश्रा, कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, सांगलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, अलमट्टी धरणाचे प्रमुख अभियंता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ यांच्यासह कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता माने दूरद़ृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
विसर्गाबाबत माहितीची देवाण-घेवाण : अलमट्टी धरणातून किती आणि कधी विसर्ग करणार याची पूर्वसूचना महाराष्ट्राला वेळेत देणार.
सांघिक आपत्ती व्यवस्थापन : पूरस्थिती निर्माण झाल्यास या चारही जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा एकत्रितपणे काम करणार.
नागरिकांना वेळेवर माहिती ः संभाव्य पूरस्थितीची माहिती नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी ‘अलर्ट सिस्टीम’ प्रभावी करणार.
नदीकाठच्या गावांची विशेष काळजी : जर पूरस्थिती निर्माण झाली तर पूरग्रस्त गावांतील नागरिकांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलवणार.