kolhapur | अवघ्या 15 हजारांत मिळते पिस्तूल 
कोल्हापूर

kolhapur | अवघ्या 15 हजारांत मिळते पिस्तूल; घरपोच करणार्‍या परप्रांतीय टोळ्या कार्यरत

आंतरराज्य शस्त्र तस्करांचा फंडा; दोन वर्षांपासून नागोरी संपर्कात

पुढारी वृत्तसेवा

दिलीप भिसे

कोल्हापूर : बिहार, मध्य प्रदेशमधील जंगलग्रस्त, निर्जन डोंगराळ टापूत सर्व्हिस रिव्हॉल्व्हर फिके पडतील किंबहुना त्यापेक्षा सरस आणि अत्याधुनिक पद्धतीने अग्नी शस्त्रांची हुबेहुब निर्मिती केली जाते. जणू घातक शस्त्रे तयार करणारे कारखानेच... उदरनिर्वाहासाठी पर्याय नसल्याने स्थानिक तरुणांकडून शस्त्रांची निर्मिती केली जाते. अवघ्या 15 हजारांत पिस्तूल, तर 25 हजारांत अत्याधुनिक रिव्हॉल्व्हर घरपोच करणार्‍या परप्रांतीय टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. तस्करी टोळ्यांचा फंडा जोमात आहे. त्यात कोल्हापूर-सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील कनेक्शन धक्कादायक आहे.

कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात अलीकडच्या काळात गुन्हेगारी वतुर्ळात तलवार, धारदार चाकू-सुरा, कोयत्याऐवजी गावठी बनावटीच्या पिस्तूलसह रिव्हॉल्व्हरचा बेधडक वापर सुरू झाला आहे. खटक्यावर बोट... अन् जाग्यावर पलटी... असाच गुन्हेगारी टोळ्यांचा सिलसिला सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 12 महिन्यांत 30 पिस्तूल पोलिसांच्या हाताला लागल्या आहेत. याचाच अर्थ जीवघेणी शस्त्रांची कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात बेफाम तस्करी होत असल्याचे चित्र आहे.

गुन्हेगारी टोळ्या धोक्याच्या वळणावर

संघटित गुन्हेगारी टोळ्यांकडे सहजरीत्या अग्निशस्त्रे उपलब्ध होऊ लागल्याने गुन्हेगारी धोक्याच्या वळणावर येऊन ठेपल्याचे चित्र आहे. कुख्यात तस्कर मनीष नागोरी याला कोल्हापूर पोलिसांनी पंधरवड्यापूर्वी अटक केली. नागोरीच्या घरातून पोलिसांनी एमडी ड्रग्जसह काही काडतुसे हस्तगत केली. चौकशीत नागोरीचे मध्य प्रदेशसह बिहारमधील आंतरराज्य शस्त्र तस्करी टोळ्यांचे कनेक्शन उघडकीला आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मध्य प्रदेशातील खरगुण जिल्ह्यात छापा टाकून सरनाम बरनाला याच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी तस्कराकडून चार पिस्तूलही हस्तगत केले आहेत. आंतरराज्य तस्कराच्या प्राथमिक चौकशीत अनेक धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागत आहे. मध्य प्रदेशसह बिहारमधील डोंगराळ, निर्जन आणि जंगलग्रस्त भागात गावठी बनावटीचे पिस्तूल, रिव्हॉल्व्हरच्या निर्मितीचे ढीगभर कारखाने बेधडकपणे सुरू असल्याची माहिती आहे. कोल्हापूर पोलिसांनी दहा दिवस ठिय्या मारून एका आंतरराज्य तस्करी टोळीचा पर्दाफाश केला आहे. शहरासह ग्रामीण भागातील गुंडांना अत्याधुनिक शस्त्रे पुरविणार्‍या टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी वरिष्ठस्तरावर विशेष मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT