कल्याणी ब्रह्मभट्ट 
कोल्हापूर

Kalyani Brahmbhatt | कराडच्या कल्याणी ब्रह्मभट्ट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती

अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कल्याणी यांना अनोखी आदरांजली

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

कोल्हापूर : गेल्या वर्षी १२ जून रोजी अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या भीषण विमान दुर्घटनेत कराडची कन्या कल्याणी ब्रह्मभट्ट व त्यांचे पती गौरव ब्रह्मभट्ट यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ऑस्ट्रेलियातील नामांकित वोलोंगोंग विश्वविद्यालयाच्या भारतातील गुजरात येथील कॅम्पसने 'कल्याणी ब्रह्मभट्ट मेमोरियल मेरिट स्कॉलरशिप' सुरू केली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करण्याच्या उद्देशाने ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियातील वोलोंगोंग विद्यापीठ हे जागतिक स्तरावरील आघाडीच्या विद्यापीठांपैकी एक मानले जाते. गुजरातमधील गिफ्ट सिटी येथे या विद्यापीठाचा भारतातील कॅम्पस कार्यरत असून अभियंता कल्याणी ब्रह्मभट्ट या विद्यापीठाच्या भारतीय मुख्य कार्यसंघाचा भाग होत्या. शिक्षण, शिस्त, सचोटी आणि विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्याबाबत त्यांची असलेली बांधिलकी लक्षात घेऊन त्यांच्या स्मरणार्थ ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार मिळणार आहे. कराडच्या कन्या कल्याणी ब्रह्मभट्ट यांच्या स्मृतीतून सुरू झालेला हा उपक्रम देशातील अनेक होतकरू विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची नवी दारे खुली करणारा ठरणार आहे. पती गौरव यांच्या कंपनीतर्फे लंडनला सेमिनारसाठी जाताना विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

अशी आहे कल्याणी ब्रह्मभट मेमोरियल मेरिट स्कॉलरशिप

1. शिक्षण शुल्कात ६० टक्के सवलत : निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ट्युशन फीमध्ये ६० टक्के आर्थिक मदत मिळणार

2. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी : कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक

3. गुणवत्तेला प्राधान्य : पात्रता परीक्षेत किमान ७५ टक्के गुण मिळविलेले असावेत.

4. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी लागू : यूओडब्ल्यू इंडिया, गिफ्ट सिटी येथील पूर्णवेळ अभ्यासक्रमांना शिष्यवृत्तीचा लाभ

5. भागीदार संस्थांमधून निवड : वोलोंगोंग विद्यापीठाच्या भागीदार महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांची निवड होणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT