कोल्हापूर : भारत आणि ब्रिटन यांच्यात नुकताच झालेला मुक्त व्यापार करार कोल्हापूर जिल्ह्यातील परंपरागत आणि औद्योगिक व्यवसायांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. या करारानुसार भारतातून ब्रिटनमध्ये पाठवण्यात येणार्या 99 टक्के वस्तूंवरील आयात कर पूर्णतः माफ करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूरची ओळख असलेल्या कोल्हापुरी चप्पल आणि गाड्यांचे सुटे भाग या दोन प्रमुख क्षेत्रांना याचा थेट फायदा होणार आहे. हा करार केवळ आर्थिक वाढीचा नाही, तर स्थानिक उद्योगांना जागतिक बाजारपेठेत प्रतिष्ठा मिळवून देणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल बनवणारे साडेतीन हजार उत्पादक कार्यरत आहेत. या पारंपरिक व्यवसायाला जीआय टॅग मिळाल्यानंतर आता युरोपियन बाजारपेठेचा प्रवेश खुलेपणाने मिळणार आहे. ब्रिटनमधील ग्राहकांचा हस्तनिर्मित, नैसर्गिक कातडीपासून बनलेल्या वस्तूंवर भर असल्याने कोल्हापुरी चप्पल युरोपमध्ये एक हाय व्हॅल्यू फॅशन उत्पादन म्हणून ओळख मिळवू शकते. यामुळे कोल्हापूरमधील कारागिरांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, तसेच या व्यवसायात नवउद्योजकांनाही संधी उपलब्ध होतील.
कोल्हापूर जिल्हा हा राज्यातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र असून येथे लघुउद्योजकांकडून तयार होणार्या ऑटोमोबाईल सुटे भागांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. जिल्ह्यातील विविध एमआयडीसी भागांतील युनिटस्मधून सध्या दरवर्षी सुमारे 150 कोटी रुपयांचे ऑटो पार्टस् निर्यात होते. आता ब्रिटनमध्ये ड्युटी फ्री प्रवेशामुळे ही निर्यात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. ब्रिटिश ऑटोमोबाईल कंपन्यांसोबत थेट पुरवठा करार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे कोल्हापूरच्या ऑटो स्पेअर पार्ट उद्योगाला जागतिक पुरवठा साखळीचा भाग होता येईल.