केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदन देतान खासदार धनंजय महाडिक  Pudhari Photo
कोल्हापूर

कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयटी पार्क हब उभारावे !

Kolhapur IT Hub | खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍कः सध्या नवी दिल्लीमध्ये संसदेचे अधिवेशन सुरू आहे. यावेळी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. महाराष्ट्रातील एक प्रगतशील जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. कोल्हापुरातील अनेक तरुण संपूर्ण देशात आणि जगभरातील नामवंत आयटी कंपन्यांमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे कोल्हापुरात आयटी पार्क हब निर्मितीसाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी वैष्‍णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोल्हापूरला उद्यमशीलतेचा मोठा वारसा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात प्रगत शहर, दळणवळणाच्या दृष्टीने सोईस्कर शहर अशी कोल्हापूरची ओळख आहे. कृषी- औद्योगिक क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर असून, दरडोई उत्पन्नामध्ये कोल्हापूर देशात अव्वल स्थानी आहे. रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीच्या दृष्टीनेही कोल्हापूर प्रगतशील जिल्हा असून, जिल्ह्यात आधुनिक औद्योगिक वसाहती आहेत. मात्र अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयटी पार्क तयार झालेले नाहीत. त्यामुळे कोल्हापूरच्या गुणवंत अभियंता आणि तरुणांना, पुणे- मुंबई- बेंगलोर- हैदराबाद अशा ठिकाणी नोकरीसाठी जावे लागते.

कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दोन लाख तरुण-तरुणी आयटी क्षेत्रात संपूर्ण देशभर काम करत आहेत. जर कोल्हापुरातच सुसज्ज अत्याधुनिक आयटी पार्क हबची निर्मिती झाली, तर स्थानिक औद्योगीकरणाला आणि अर्थकारणाला मोठी गती मिळेल. त्यामुळे केंद्र सरकारने पुढाकार घेऊन, कोल्हापुरात आयटी पार्क हब उभारण्यासाठी लक्ष घालावे, अशी विनंती खासदार महाडिक यांनी अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. कोल्हापुरातील प्रस्तावित आयटी पार्क साठी राज्य सरकार ही सकारात्मक असून, स्थानिक पातळीवर जागा आणि अन्य पायाभूत सुविधांची उपलब्धता आहे.

आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने पुढाकार घेऊन कोल्हापुरात आयटी पार्क हबची निर्मिती करावी, जेणेकरून स्थानिक तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी मिळतील, विविध बहुराष्ट्रीय कंपन्या कोल्हापुरात येतील; आणि त्यातून कोल्हापूरच्या अर्थकारणाला गती मिळेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. खासदार महाडिक यांनी केलेल्या मागणीला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून कोल्हापुरात आयटी पार्क हब निर्मितीची शक्यता बळावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT