kolhapur | प्रस्तावित आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचे नाव Pudhari
कोल्हापूर

kolhapur | प्रस्तावित आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचे नाव

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठराव; अर्थसंकल्पात निधीच्या तरतुदीसाठी प्रस्ताव

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : विकासवाडी (ता. करवीर) येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याचा ठराव बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आला. या स्टेडियमच्या उभारणीसाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली जाणार आहे. त्याबाबत अर्थसंकल्पात तरतूद करावी, याकरिता निधी मागणीचा प्रस्ताव दिला जाईल, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणीसाठी राज्य शासनाने 30 एकर जागा विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. आमदार अमल महाडिक यांनी क्रिकेट स्टेडियमशी संबंधित दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांची आठवण म्हणून या स्टेडियमला त्यांचे नाव देण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, कोल्हापुरात क्रिकेटचे स्टेडियम व्हावे, याकरिता प्रारंभी 15 एकर जागेची मागणी केली होती. त्यावर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरला मोठी क्रीडा परंपरा आहे. यामुळे कोल्हापुरात भव्यदिव्य असे आंतरराष्ट्रीय स्टेडियम व्हायला हवे, असे सांगत 30 एकर जागेची मागणी करा, आपण ती मिळवून देऊ. केवळ जागाच नाही, तर राज्य शासनाकडूनही हे स्टेडियम उभारणीसाठी निधीही दिला जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी बैठका घेतल्या, 30 एकर जागेसाठी आणि स्टेडियमच्या निधीसाठीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी पाठपुरावा केला. यामुळे त्यांचे नाव या स्टेडियमला द्यावे, असा ठराव करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT