International cricket stadium in kolhapur: कोल्हापुरात होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम Pudhari
कोल्हापूर

International cricket stadium in kolhapur: कोल्हापुरात होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

विकासवाडीत 12 हेक्टर 76 आर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : क्रीडानगरी कोल्हापुरात आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा झाला आहे. या स्टेडियमच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली विकासवाडी (ता. करवीर) येथील 12 हेक्टर 76 आर अशी सुमारे 30 एकर इतकी शासकीय जमीन विनामूल्य देण्यात येणार आहे. मुंबईत मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागास भोगाधिकार मूल्यरहित व महसूलमुक्त (विनामूल्य) तसेच कब्जेहक्काने ही जमीन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत क्रीडा सुविधांच्या विकासाला चालना मिळणार आहे. यामुळे युवकांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

जिल्हा क्रिकेट असोसिएशनने कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारावे, अशी मागणी असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष संभाजीराजे यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी त्याबाबत पाठपुरावा सुरू केला. यानंतर विविध लोकप्रतिनिधींनीही राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. यानंतर विविध ठिकाणी जागांचा शोध सुरू करण्यात आला. त्यातील पुणे-बंगळूर महामार्गालगतच विकासवाडी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जमिनीपैकी 30 एकर जमिनीचा पर्याय समोर आला. ही जमीन कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर प्रयत्न सुरू झाले.

या जागेबाबत जिल्हाधिकारी स्तरावर बैठका झाल्या. जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला. यानंतर 3 सप्टेंबर 2024 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली होती. या बैठकीत कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी विकासवाडी येथील 30 एकर जमीन कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनला देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर या निर्णयाला मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील मंजुरी देण्यात आली आहे.

ही जमीन शालेय शिक्षण व क्रीडा विभागास प्राप्त झाल्यानंतर शासनाच्या नियम, तरतुदी व धोरणांचा विचार करून कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला आवश्यकतेनुसार जागा उपलब्ध करून देण्यासाठी करार केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT