kolhapur |आंतरधर्मीय विवाहातील साक्षीदाराला चोप Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur |आंतरधर्मीय विवाहातील साक्षीदाराला चोप

शुक्रवार पेठेत ‘लव्ह जिहाद’चा आरोप

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मुलगी आटपाडीतील... मुलगा जयसिंगपूरचा... दोघांनी केले लव्ह मॅरेज... दोन्ही धर्मांतील साक्षीदारांच्या साक्षीने झाला आंतरधर्मीय विवाह... मात्र मुलीच्या नातेवाईकांनी ‘लव्ह जिहाद’चा आरोप करत कोल्हापुरातील एका साक्षीदाराला चांगलाच चोप दिला... त्यात काही कार्यकर्त्यांनीही चांगलाच हात धुवून घेतला... अखेर घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी त्या साक्षीदाराची जमावाच्या तावडीतून सुटका केली. घटनेमुळे शुक्रवार पेठेत बुधवारी (दि. 18) दुपारी 3 च्या सुमारास वातावरण तणावपूर्ण बनले. मात्र, घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली नाही.

11 जूनला रजिस्टर मॅरेज

आटपाडीमधील एका मुलीचे जयसिंगपूरमधील मुलाशी प्रेमसंबंध जुळले. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. परंतु, दोघांचे धर्म वेगवेगळे असल्याने ते तणावात होते. मात्र, कोणत्याही परिस्थितीत एकत्र राहण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यासाठी रजिस्टर करून विवाह करण्याचे ठरविले. त्यासाठी दोन्ही धर्मातील साक्षीदारांना घेतले. 11 जून रोजी कोल्हापुरात त्यांनी कायदेशिररित्या विवाह केला. त्यानंतर साक्षीदार आणि नवरा-नवरी आपापल्या घरी गेले.

मुलीचे पोलिसांत अ‍ॅफीडेव्हीट...

दरम्यानच्या कालावधीत मुलीच्या नातेवाईकांनी आटपाडी पोलिस ठाण्यात मुलगी हरविल्याची (मिसींग) फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला. नंतर पोलिसांना संबंधित मुलीने विवाह केल्याचे समजले. मुलीला संपर्क साधल्यावर तीनेही पोलिसांना विवाहाबाबत सांगितले. तसेच जयसिंगपूर पोलिस ठाण्यात जाऊन त्या मुलीने मी स्वेच्छेने विवाह केल्याचे अ‍ॅफीडेव्हीट सादर केले. त्यामुळे पोलिसांनी मिसिंग फाईल बंद केली.

नातवाईकांना संताप अनावर...

इतर धर्मातील मुलाबरोबरच मुलीने प्रेमविवाह केल्याने नातेवाईकांना संताप अनावर झाला होता. त्यांनी मुलीला सोबत येण्याबाबत विनवणी केली. परंतू तीने थेट नकार दिला. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी रजिस्टर मॅरेजमधील साक्षीदारांचा शोध घेतला. त्यामधील एकजण कोल्हापुरातील शुक्रवार पेठेत राहत असल्याची माहिती मिळाली. नातेवाईकांनी बुधवारी कोल्हापुर गाठले. इथल्या कार्यकर्त्यांना घटनेची माहिती दिली. त्या कार्यकर्त्यांबरोबर नातेवाईक त्या साक्षीदाराच्या दारात गेले. त्या साक्षीदाराला घरातून बाहेर ओढून मारहाण सुरू केली. कार्यकर्त्यांनीही त्याला बेदम चोप दिला. घटनेने शुक्रवार पेठेत प्रचंड तणाव निर्माण झाला.

पोलिसांनी केली साक्षीदाराची सुटका...

काहीजणांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही मिनिटात पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी त्या साक्षीदाराची जमावाच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात आणले. संबंधित मुलीच्या नातेवाईकांनाही पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकुण घेतल्या. तसेच मुलीशी आणि जयसिंगपूर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी मुलगी सज्ञान असून तिने स्वेच्छेने विवाह केल्याचे सांगितले. तसेच मारहाणीबाबत दोन्हीकडून कोणतीच तक्रार नसल्याने पोलिसांनी सर्वांना सोडून दिले आणि घटनेवर पडदा पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT