कोल्हापूर : गर्भलिंग निदान, स्त्रीभ्रूण हत्याप्रकरणी कारवाया वाढवा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी मंगळवारी जिल्हास्तरीय ‘पीसीपीएनडीटी’ सल्लागार समितीच्या बैठकीत दिले.
डॉ. राठोड म्हणाले, गर्भलिंग निदानासारख्या गंभीर सामाजिक गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अत्यावश्यक आहे. अशा कृत्याची अचूक माहिती देणाऱ्या किंवा स्टिंग ऑपरेशनसाठी पुढाकार घेणाऱ्या नागरिकांना, न्यायालयात खटला दाखल झाल्यावर राज्य शासनाकडून रक्कम स्वरूपात बक्षीस दिले जाते.
जिल्ह्याला लागून असलेल्या सीमावर्ती भागात विशेष लक्ष ठेवून काम करा, असे सांगत डॉ. राठोड म्हणाले, गुप्त माहितीच्या आधारे छापे, तपासण्या आणि अन्य प्रतिबंधात्मक कारवाया वाढवा. जिल्ह्यातील स्त्री-पुरुष जन्म गुणोत्तर अपेक्षेप्रमाणे नसल्याची खंत व्यक्त करत अवैध गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री हा चिंतेचा विषय आहे. त्याला कठोर प्रतिबंध घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने संयुक्त तपासणी मोहीम राबवा. नियमबाह्य पद्धतीने औषधांची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा.
बैठकीला प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, कोल्हापूर महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, इचलकरंजी महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, कायदेविषयक सल्लागार ॲड. गौरी पाटील यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
टोल फ्री क्रमांकावर माहिती द्या
गर्भलिंग निदान, स्त्रीभ्रूण हत्या आणि संबंधित बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. संशयास्पद बाबींची माहिती टोल फ्री क्रमांक १८००-२३३-४४७५ वर द्या, असे आवाहन डॉ. राठोड यांनी केले.
२४५ पैकी १९४ केंद्रांत गर्भवती महिलांची तपासणी
बैठकीत जिल्ह्यातील ‘पीसीपीएनडीटी’ अंमलबजावणीचा आढावा झाला. जिल्ह्यात एकूण ३५३ नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्रांपैकी २४५ केंद्रे कार्यरत असून, त्यापैकी १९४ केंद्रांत गर्भवती महिलांची तपासणी केली जाते. विहित कालावधीत गर्भपाताची परवानगी असलेल्या २०२ केंद्रांपैकी ७९ खासगी, ९५ शासकीय व २८ महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांचा समावेश आहे. या केंद्रांची नियमित, अचानक तपासणी करा, असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.