कोल्‍हापूर : रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे शनिवारी निवडणूक साहित्‍याचे वितरण करण्‍यात आले.   (छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर

Gokul Dairy Election | ‘गोकुळ’साठी आज ईर्ष्येने मतदान

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ ‘गोकुळ’साठी रविवारी (दि. १८) सकाळी ८ ते दुपारी ५ या वेळेत मतदान होत आहे. जिल्‍ह्यातील १२ तालुक्‍यांतील ३५ मतदान केंद्रांवर ५४१८ मतदार मतदानाचा हक्‍क बजावतील. प्रत्‍येक केंद्रावर कर्मचारी नियुक्‍त केले आहेत. शनिवारी सकाळी त्‍यांना रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे मतदान साहित्‍याचे वाटप झाले. यानंतर सर्व केंद्रांवर कर्मचारी दाखल झाले. सर्व केंद्रांवर कडेकोट पोलिस बंदोबस्‍त तैनात केला आहे.

संचालक पदाच्‍या २५ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात आहेत. छ. शाहू शेतकरी विकास आघाडी आणि राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीमध्‍ये थेट लढत होत आहे. १९ ऑक्‍टोबरला मतमोजणी होईल. प्रशासनाकडूनही प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. पाच स्वतंत्र मतपत्रिकांचा वापर केला आहे. सर्वसाधारण गटासाठी पांढरी, महिला प्रतिनिधींसाठी गुलाबी, इतर मागास प्रवर्गासाठी फिकट हिरवी, भटके विमुक्‍तसाठी फिकट पिवळी, तर अनुसूचित जाती-जमातीसाठी फिकट निळ्या रंगाची मतपत्रिका असेल. ३५ केंद्राध्यक्ष, २१० मतदान अधिकारी व ३५ शिपाई नियुक्त केले आहेत. एक राखीव केंद्राध्यक्ष, ३० राखीव मतदान अधिकारी आणि पाच राखीव शिपायांची व्यवस्था केली आहे. मतपत्रिकांसह साहित्‍य रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये जमा केले जाईल.

३२ टेबलांवर होणार मतमोजणी

गोकुळसाठी सोमवारी (दि. १९) ३२ टेबलांवर मतमोजणी होईल. सकाळी आठ वाजता रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. केंद्र व मतमोजणी ठिकाणी प्रतिबंधात्‍मक आदेश लागू असेल.

मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे.
मौसमी चौगुले निवडणूक निर्णय अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT