एकनाथ नाईक
कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांत अतितीव्र लेसर किरणांमुळे सुमारे ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे; तर सात जणांना कायमचे अंधत्व आले आहे. त्यामुळे तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हा मोह सोडायला हवा. आनंदाच्या उत्सवात लेसरमुळे आरोग्य बिघडण्याचे विघ्न हवेच कशाला, अशी भावना जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात मिरवणुका, सण, उत्सवांसह अन्य सोहळ्यांमध्ये साऊंड सिस्टीमसोबत लेसर शोचे आकर्षण तरुणाईमध्ये वाढले आहे. मिरवणुका आकर्षक बनवण्यासाठी अतितीव्र लेसर, साऊंड सिस्टीमच्या दणदणाटाचा वापर केला जात आहे. लेसर किरणांमधून बाहेर पडणारी अतितीव्र किरणे, साऊंड सिस्टीमच्या आवाजाने अनेकांच्या जीवनात अंधार पसरला आहे. या सगळ्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे तरुण मंडळांनी आता विचार करण्याची गरज आहे.
लेसरचे दुष्परिणाम
दृष्टिपटलाला इजा होणे.
डोळ्यात रक्तस्त्राव होणे.
कायमचे अंधत्व येणे.
धूसर दृष्टी होणे.
डोळ्यांची जळजळ होणे.
डोळ्यातून पाणी येणे.
चक्कर येणे.
इशारा असतानाही सर्रास वापर
लेसर किरणांचा वापर उद्योगधंदे, वैद्यकीय क्षेत्रासाठी केला जातो. वापरात चूक झाल्यास गंभीर परिणाम होतात. त्यामुळे लेसर उपकरणांवर इशारा लिहिलेला असतो. तरीही लेसरचा वापर मिरवणुकांमध्ये केला जातो. लेसरची तीव्र किरणे डोळ्यांवर इजा करतात.
लेसर शोमुळे डोळ्याचा बाह्य बाजूला सौम्य इजा होते. डोळ्यातील रेटिनावरील रक्तवाहिन्या फुटून त्यातून रक्तस्राव होतो. त्यामुळे अंधत्व येते. लेसरमुळे इजा झालेले वर्षांला सुमारे १०० रुग्ण उपचारासाठी नेत्र तज्ज्ञांकडे येतात. टप्प्याटप्प्याने काहींची दृष्टी अंधूक होते. त्यामुळे याबाबत जनजागृती होणे काळाजी गरज आहे.डॉ. चेतन खारकांडे