कोल्हापूर : आयुष्यातील प्रतिकूल परिस्थिती माणसाला खचवते, असे अनेकदा म्हटले जाते; मात्र काही जिद्दी माणसे याच संकटांना पायरी बनवून यशाच्या शिखरावर पोहोचतात. कोल्हापूर महापालिकेचे नूतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांचा जीवनप्रवास हा अशाच संघर्षातून साकारलेला प्रेरणादायी आदर्श आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एका छोट्याशा आदिवासी गावात त्यांचा जन्म झाला. भिल्ल समाजातील असल्याने घरात अठरा विश्वे दारिद्र्य. त्यातच लहानपणीच वडिलांचे निधन झाले. वडिलांचा चेहराही पाहायला मिळाला नाही, ही आयुष्यभराची पोकळी त्यांच्या मनात राहिली. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांच्या आईने दारू गाळण्याचा व्यवसाय केला. त्या परिस्थितीत बालपण कसे गेले असेल, याची कल्पना करणेही कठीण आहे.
लहानपणी दुधासाठी रडणार्या राजेंद्र यांच्या तोंडात दुधाऐवजी दारूचे थेंब पडायचे, ही वेदनादायक आठवण त्यांच्या संघर्षाची साक्ष देते. थोडे मोठे झाल्यावर ते दारू पिणार्यांना चकना आणून देत; पण या सगळ्या प्रतिकूलतेतही त्यांच्या आईने एक गोष्ट कायम ठेवली, शिक्षणाची ओढ.‘माझं पोरं शिकणार,’ हा तिचा विश्वास होता. जिल्हा परिषद शाळेतून त्यांचे शिक्षण सुरू झाले. भिल्ल समाजातील शिकणारी ती पहिलीच पिढी. एकदा परीक्षेच्या काळात अभ्यास करत असताना एका व्यक्तीने त्यांना चकना आणायला सांगितले. त्यांनी नकार दिल्यावर ‘शिकून काय डॉक्टर-इंजिनिअर होणार आहेस’ असे हिणवले. त्या शब्दांनी त्यांच्या मनाला चटका लावला; पण त्याच क्षणी आईने ठामपणे सांगितले, ‘माझं पोरं डॉक्टर-इंजिनिअर होणार.’ आईचा तो विश्वास त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. गावापासून 150 किलोमीटर दूर जाऊन त्यांनी शिक्षण घेतले. दहावीमध्ये 97 टक्के गुण मिळवून त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली. यानंतर मुंबईतील जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी त्यांना प्रवेश मिळाला. आर्थिक परिस्थिती कमकुवत असली, तरी त्यांनी हार मानली नाही. शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण सुरू ठेवले. आई किरकोळ खर्चासाठी पैसे पाठवत होती. वैद्यकीय शिक्षणासोबतच त्यांनी यूपीएससीची तयारीही सुरू ठेवली.
परिश्रमांचे चीज झाले आणि एकाच वेळी एमबीबीएस आणि यूपीएससीचा निकाल लागला. अवघ्या 31 व्या वर्षी ते भिल्ल समाजातील पहिले कलेक्टर बनले. नंदुरबार जिल्ह्यातच त्यांची पहिली पोस्टिंग झाली. डॉ. भारूड यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशाची कहाणी नाही, तर तो संघर्ष, जिद्द आणि आईच्या विश्वासाची ताकद दाखवणारा आहे. मी काय गमावले यापेक्षा संघर्षाने मला काय दिले हे महत्त्वाचे, हा त्यांचा दृष्टिकोन आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उभा राहिलेला हा आदिवासी तरुण आज प्रशासनाच्या उच्च पदावर विराजमान झाला आहे. त्यांची गगनभरारी केवळ त्यांची नाही, तर समाजातील प्रत्येक संघर्ष करणार्या युवकासाठी आशेचा किरण आहे.