सुनील कदम
कोल्हापूर : सह्याद्रीतील अतिसंवेदनशील क्षेत्र घटविण्याची मागणी करताना सर्वच राज्यांनी त्यामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे. सर्वांना जणूकाही सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये औद्योगिक विकास साधायचा आहे.
औद्योगिक विकासाला प्राधान्य!
महाराष्ट्र शासनाने राज्यातील १७ हजार ३४० चौरस किलोमीटर अतिसंवेदनशील क्षेत्रापैकी १,९८१ चौ. कि. मी. क्षेत्र घटविण्याची मागणी केली आहे. या १,९८१ चौ. कि. मी. क्षेत्रातील ३८८ गावांनाही या यादीतून वगळण्याची मागणी केली आहे. या ३८८ गावांपैकी १०० गावांमध्ये विविध औद्योगिक प्रकल्प प्रस्तावित आहेत. कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण २० खाण प्रकल्प प्रस्तावित आहेत. रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रात तब्बल ५४ औद्योगिक वसाहती प्रस्तावित आहेत. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये मिळून स्पेशल औद्योगिक समूह प्रस्तावित आहेत. विशेष म्हणजे या १०० गावांपैकी ७५ गावे एकट्या कोकणातील आहेत. तसेच अतिसंवेदनशील क्षेत्रातून जी ३८८ गावे वगळण्याचा प्रस्ताव आहे, त्यापैकी ३२८ गावे कोकणातील आहेत. मुळात ही गावे अतिसंवेदनशील क्षेत्रात येतच नाहीत अशी राज्य शासनाची भूमिका आहे.
गोवा आणि कर्नाटकची भूमिका!
गोवा आणि कर्नाटकची भूमिकाही यापेक्षा वेगळी नाही. अतिसंवेदनशील क्षेत्रातून ४५ गावे वगळण्याची गोवा शासनाची मागणी आहे. या भागात नव्याने काही खाण प्रकल्प आणि औद्योगिक प्रकल्प उभारण्याची त्यांची भूमिका आहे. कर्नाटकने तर तब्बल साडेपाच हजार चौरस किलोमीटर क्षेत्र अतिसंवेदनशील क्षेत्रातून वगळण्याची मागणी केली आहे. कर्नाटकलाही या भागात काही खाण प्रकल्प, औद्योगिक वसाहती आणि विशेष औद्योगिक समूह विकसित करायचे आहेत.
सह्याद्रीचे काय होईल?
सह्याद्रीच्या अतिसंवेदनशील क्षेत्रात जंगले भुईसपाट करून अशा पद्धतीने शेकडो खाण प्रकल्प, औद्योगिक वसाहती आणि विशेष औद्योगिक समूह उभे राहिल्यानंतर पर्यावरणदृष्ट्या सह्याद्रीचे काय होईल याची कल्पनाच करवत नाही.
शिवाय हे एवढेच होणार नाही. या खाणींना आणि औद्योगिक वसाहतींना जोडणारे रस्ते त्याच भागातून करावे लागतील. त्या त्या प्रकल्पासाठी म्हणून पाणी आणि सांडपाण्याच्या निचऱ्याची सोय तिथेच करावी लागेल. औद्योगिक प्रकल्पापाठोपाठ नागरी वसाहती येतील, त्यांना जागा द्यावी लागेल. दळणवळणाची मजबूत व्यवस्था करावी लागेल, या सगळ्यासाठी पुन्हा पुन्हा सह्याद्रीच्या पर्यावरणावर कुऱ्हाड चालवावी लागणार आहे, तो विनाश होईल तो वेगळात!