पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न बघताना खेळाला प्राधान्य देत खेलो इंडियाच्या माध्यमातून गावागावांतील मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांना जागतिक क्रीडा मैदानावर पोहोचवले आहे. याच माध्यमातून बुद्धिबळ (चेस) सारख्या खेळाला प्राधान्य देण्यात आले असून येत्या काळात भारत ग्लोबल चेस पावर हाऊस होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 2030 मध्ये कॉमनवेल्थ गेमचे व 2036 मध्ये ऑलम्पिकचे आयोजन करण्यास भारत तयार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केले.
गोव्यात आयोजित फिडे विश्वचषक बुद्धिबळ (चेस) स्पर्धेचे बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर उद्घाटन केल्यानंतर डॉ.मांडविया बोलत होते. याप्र संगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री रमेश तवडकर, खासदार सदानंद शेट तानावडे, फिडेचे जागतिक अध्यक्ष अरकादे डोर्कोवीच, अ. भा. चेस फेडरेशनचे अध्यक्ष नितीन नारंग, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, क्रीडा सचिव संतोष सुखदेव व क्रीडा संचालक डॉ. अजय गावडे उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री डॉ. मांडवीया म्हणाले, फिडे वर्ल्डकप भारतात 23 वर्षांनंतर आयोजित करण्यात आला आहे. भारतात विश्वनाथ आनंदपासून ते गुकेशपर्यंत दहा ग्रँडमास्टर झालेले आहेत. यावरून भारतात बुद्धिबळ किती लोकप्रिय आहे, हे स्पष्ट होते. भारत तंत्रज्ञानासोबतच जागतिक बुद्धिबळाचे प्रमुख केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे डॉ. मांडवीया म्हणाले. भारतातील युवक बुद्धीबळात मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून खेलो इंडियाच्या माध्यमातून या खेळाकडे मुले आकर्षित झाली. आता भारत बदलत आहे, इतर क्षेत्रांसोबत खेळातही अग्रेसर होत आहे. हा नवा भारत आहे. खेळ संस्कृतीस प्रोत्साहन दिले जात आहे. सुंदर गोव्यात फिडे विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होते हे सर्वांसाठीच आनंददायी आहे.
फिडेचे अध्यक्ष डोर्कोवीच यांनी फिडे स्पर्धा जगाला जोडण्याचे काम करत असल्याचे सांगून गोव्यातील स्पर्धा यादगार होणार असल्याचे म्हटले. सुरुवातीला सुखदेव यांनी स्वागत केले. 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबरपर्यंतच्या या स्पर्धेत 80 देशांचे 206 खेळाडू सहभागी झाल्याची माहिती त्यांनी दिली. उद्घाटन सोहळ्यातील रंगारंग कार्यक्रमात विविध राज्यांची लोकनृत्ये सादर झाली. गायिका हेमा सरदेसाई यांनीही गाणी सादर केली.