Superbugs | सुपरबग्सविरुद्ध भारताचे नवे अस्त्र! 
कोल्हापूर

Superbugs | सुपरबग्सविरुद्ध भारताचे नवे अस्त्र!

‘झायनिक’ची कहाणी; औषध संशोधनातील भारतीय झेप

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : जगभरातील आरोग्यव्यवस्थेसमोर उभ्या ठाकलेल्या सर्वांत गंभीर संकटांपैकी एक म्हणजे प्रतिजैविकांच्या अतिवापरातून आणि चुकीच्या वापरातून निर्माण होणारा प्रतिजैविक प्रतिकार. उपलब्ध औषधांना दाद न देणारे ग्राम-निगेटिव्ह ‘सुपरबग्स’ रुग्णालयांतील उपचारांसाठी मोठे आव्हान बनत आहेत. अशातच भारतातून विकसित झालेल्या झायनिक (झायनिक-सेफेपिम+झिडेबॅक्टम) या नव्या प्रतिजैविकाने या लढ्याला नवे परिमाण दिले.

भारतातील वॉकहार्ट या प्रसिद्ध औषधनिर्माता कंपनीने विकसित केलेल्या या औषधाला भारताच्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओे) मे २०२६ मध्ये गुंतागुंतीच्या मूत्रमार्ग संसर्गासाठी, मूत्रपिंडाच्या संसर्गासाठी आणि ग्राम-निगेटिव्ह जीवाणूंमुळे रक्तसंसर्ग झालेल्या प्रौढ रुग्णांसाठी मंजुरी दिली. त्यानंतर अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनानेदेखील गुंतागुंतीच्या मूत्रमार्ग संसर्गासाठी आणि मूत्रपिंडाच्या संसर्गासाठी मंजुरी दिली आहे.

वॉकहार्टचे हे यश नव्या औषधापुरते मर्यादित नाही, तर भारताने औषध शोध आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात घेतलेली ही महत्त्वाची झेप आहे. झायनिकची ताकद त्याच्या संयोजनात आहे. ‘सेफेपिम’ हे चौथ्या पिढीतील सेफॅलोस्पोरिन असून, झिडेबॅक्टॅम हे पारंपरिक बीटा-लॅक्टॅमेज प्रतिबंधकापेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करणारे बीटा-लॅक्टॅम प्रभाववर्धक आहे. हे संयोजन जीवाणूंच्या पेनिसिलिन-बाइंडिंग प्रथिनांमधील अनेक लक्ष्यांवर परिणाम करते आणि विविध प्रतिकार यंत्रणांना तोंड देण्याची क्षमता दर्शविते. मात्र, हे सर्व सुपरबग्सवरील रामबाण औषध नाही. त्याचा वापर ठोस संशय असलेल्या संसर्गांपुरताच मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.

परिणामकारकता ८९ टक्के

तिसर्‍या टप्प्यातील ‘एनहान्स-1’ वैद्यकीय चाचणी हा या औषधाच्या विकासातील निर्णायक टप्पा ठरला. ५३० रुग्णांच्या आंतरराष्ट्रीय अभ्यासात झायनिकची तुलना मेरोपिनेमशी करण्यात आली. उपचाराच्या यशाची पडताळणी करताना वैद्यकीय बरेपणा आणि सूक्ष्मजीवशास्त्रीय प्रतिसादाचा संयुक्त परिणाम झायनिकमध्ये ८९ टक्के, तर मेरोपिनेममध्ये ६८.४ टक्के होता. अमेरिका, युरोप, लॅटिन अमेरिका, चीन आणि भारतातील 64 केंद्रांचा या अभ्यासात सहभाग होता.

तर नव्या औषधाविरुद्धही प्रतिकार निर्माण होईल...

गरज नसताना प्रतिजैविके देणे, विषाणूजन्य संसर्गामध्ये त्यांचा वापर, उपचारक्रम अपूर्ण ठेवणे आणि जीवाणू संवर्धन व औषध-संवेदनशीलता चाचणी उपलब्ध असतानाही व्यापक प्रभावक्षेत्राच्या औषधांचा अतिरेक करणे थांबले नाही, तर या नव्या औषधाविरुद्धही प्रतिकार निर्माण होईल. औषध शोधण्याची क्षमता सिद्ध झाली; आता त्याचा जबाबदार वापर करण्याची क्षमता सिद्ध करावी लागेल. कारण सुपरबग्सविरुद्धच्या युद्धात प्रत्येक नवे प्रतिजैविक हे विज्ञानाचे नवे अस्त्र असते; पण त्याचा बेफाम वापर झाला, तर तेच अस्त्र पुढच्या पिढीसाठी बोथट होऊ शकते.

भारताची क्षमता अधोरेखित

नवे प्रतिजैविक विकसित करणे म्हणजे केवळ एखादा रेणू शोधणे नव्हे. प्रयोगशाळेतील संशोधनापासून पूर्व-वैद्यकीय अभ्यास, पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या आणि नियामक तपासणी हा अत्यंत खर्चिक व दीर्घकालीन प्रवास आहे. झायनिकने भारतीय औषध उद्योगाची ही क्षमता अधोरेखित केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT