JWALA Micro-Missile | शत्रू ड्रोनवर आता ‘ज्वाला’चा प्रहार! 
कोल्हापूर

JWALA Micro-Missile | शत्रू ड्रोनवर आता ‘ज्वाला’चा प्रहार!

उड्डाण चाचणी लवकरच; पाच किलोमीटरपर्यंत वेध घेण्याची क्षमता

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : अमेरिकेच्या पाठिंब्यावर पाकिस्तान भारतीय सीमेवर हल्ला करण्यासाठी ड्रोनच्या निर्मितीच्या हालचाली वेगवान करत असताना भारताच्या खासगी क्षेत्रात विकसित केलेली पहिली स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणाली ‘ज्वाला’ लवकरच प्रायोगिक उड्डाण चाचणीसाठी सज्ज होणार आहे. आयजी डिफेन्स या कंपनीने विकसित केलेल्या या कमी पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्राच्या दोन घन इंधन रॉकेट मोटर्सच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. आगामी काही महिन्यांत संपूर्ण क्षेपणास्त्राची पहिली प्रायोगिक चाचणी होण्याची अपेक्षा आहे.

५० मीटर ते ५ किमीपर्यंत वेध घेण्याची क्षमता

‘ज्वाला’ची मारा करण्याची क्षमता दोन ते पाच किलोमीटरपर्यंत असून, ५० मीटर ते पाच हजार मीटर उंचीवरील हवाई लक्ष्यांचा वेध घेण्याची क्षमता त्यात असेल. विशेषतः शत्रूच्या ड्रोनचा नाश करण्यासाठी ही प्रणाली विकसित केली आहे. कमी खर्चात उपलब्ध होणारी आणि मोठ्या संख्येने तैनात करता येणारी प्रभावी संरक्षण यंत्रणा उभारणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. क्षेपणास्त्रात ०.५ ते १.५ किलो वजनाचे पूर्वविखंडित उच्चस्फोटक वॉरहेड आणि प्रॉक्सिमिटी फ्यूज बसविण्यात येणार आहे. त्यामुळे लक्ष्याच्या जवळ पोहोचून स्फोटाद्वारे ड्रोन नष्ट करता येईल.

अचूक लक्ष्यभेदाचे उद्दिष्ट

कमाल पल्ल्यावरही दोन मीटरपेक्षा कमी अचूकतेने लक्ष्य भेदण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. लक्ष्याची ओळख पटल्यापासून क्षेपणास्त्र डागण्यापर्यंतचा कालावधी सात सेकंदांपेक्षा कमी असेल, असा कंपनीचा दावा आहे. या क्षेपणास्त्रात ड्युअल-पल्स सॉलिड रॉकेट मोटर आणि फिन-कंट्रोल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सीकर, एव्हिऑनिक्स, वॉरहेड आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपप्रणालींच्या विकासातही कंपनीने प्रगती केली आहे.

रशिया-युक्रेन आणि अमेरिका, इस्राईल-इराण या दोन्ही युद्धांमध्ये ड्रोननी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तुलनेने स्वस्त असलेल्या या ड्रोनच्या मार्‍याने जगातील भल्याभल्या संरक्षण सामग्री निर्मिती करणार्‍या कंपन्यांना अचंबित केले होते. इराणच्या प्रभावाखाली पाकिस्तानने ड्रोन प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार पंजाब प्रांतातील टॅक्सिला येथे पाकिस्तान लष्कराच्या अखत्यारीतील हेवी इंडस्ट्रीज टॅक्सिला (एचआयटी) या संरक्षण उत्पादन संस्थेने ड्रोन निर्मितीचा कारखाना उभारला आहे. याखेरीज १६ सप्टेंबर २०२६ ला अमेरिकेच्या ‘पॉवरस’ या ड्रोन कंपनीच्या प्रतिनिधींनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्डमार्शल असिम मुनीर यांनी रावळपिंडी येथे भेट घेतली. या कंपनीचे सहसंस्थापक ब्रेट वेलिकोविच हे असून, या कंपनीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र ट्रम्प ज्युनिअर व एरिक ट्रम्प यांची गुंतवणूक आहे. कंपनीने मर्यादित खरेदी आदेश मिळाल्याचे जाहीर केले आहे. तसेच पाकिस्तानमध्ये तंत्रज्ञान निर्मिती शक्यता तपासल्या जात असल्याचे वृत्त ‘अल् जझिरा’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. या पार्श्वभूमीवर जमिनीवरून ड्रोनचा लक्ष्यभेद करणारी ही भारतीय यंत्रणा सज्ज होत असून देशाच्या आत्मनिर्भरतेचे हे महत्त्वाचे पाऊल तसेच ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला मिळालेले मोठे यश समजले जाते आहे.

‘ज्वाला’मुळे भारताला मिळाला ‘हार्ड किल’ पर्याय

‘ज्वाला’ ही कंपनीच्या ‘ग्रिड डिफेन्स’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित संरक्षण नेटवर्कचा भाग असेल. या प्रणालीद्वारे विविध सेन्सर्सकडून मिळणारी माहिती एकत्रित करून हवाई लक्ष्यांची ओळख, मागोवा आणि धोक्याचे मूल्यमापन केले जाईल. त्यानुसार अधिकृत संरक्षणात्मक कारवाईचे समन्वयन करण्यात येईल. दरम्यान, कंपनीची ‘टी-शूल बीम’ ही ड्रोनविरोधी प्रणाली पोखरण येथे भारतीय हवाई दलाच्या ‘ड्रोनॅथॉन २०२६’ सरावात प्रदर्शित करण्यात आली होती. ही प्रणाली इलेक्ट्रॉनिक प्रतिकारात्मक उपायांद्वारे ड्रोन निष्प्रभ करते. सर्व चाचण्या यशस्वी झाल्यास ‘ज्वाला’ भारताच्या ड्रोनविरोधी संरक्षण व्यवस्थेला स्वदेशी आणि किफायतशीर ‘हार्ड-किल’ पर्याय उपलब्ध करून देऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT