india vs pakistan match 
कोल्हापूर

india vs pakistan match : व्हिडिओ पाहा!भारताच्या विजयाच्या जल्लोषाला गालबोट! कोल्हापुरात तरुणांची पोलिसांवर चप्पलफेक

Kolhapur news: नेहमीप्रमाणेच भारत विरूद्ध पाकिस्तान मॅच भारताने जिंकताच शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रिकेटप्रेमी अन् नागरिकांनी मोठा जल्लोष केला

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर: आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. जगभर या विजयाचा उत्सव साजरा करण्यात आला. कोल्हापुरात देखील नेहमीप्रमाणे उत्साहाचं वातावरण होतं. मॅच जिंकताच शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रिकेटप्रेमी आणि नागरिकांनी मोठा जल्लोष करण्यासाठी गर्दी केली. भारताने आशिया कपवर नाव कोरल्यामुळे हा आनंदोत्सव मोठा आणि उत्स्फूर्त होता.

मात्र, गर्दी अनियंत्रित होऊ लागल्याने आणि रस्त्यावर मोठा गोंधळ निर्माण झाल्यामुळे, पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी हस्तक्षेप केला. सुरुवातीला सौम्य प्रयत्न केल्यानंतरही नागरिक ऐकत नसल्याने, पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. यामुळे जमावातील तरुण अधिकच संतप्त झाले. पोलिसांच्या लाठीचार्ज विरोधात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट पोलिसांवरच चप्पलफेक केली. यामुळे छत्रपती शिवाजी चौक परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. आनंदाच्या जल्लोषाला हिंसक वळण लागल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या गोंधळात आणि रेटारेटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील काही दगडी भागही कोसळला. या घटनेमुळे काही काळ शिवाजी चौकात अशांतता पसरली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त फौजफाटा बोलवावा लागला. जल्लोषादरम्यान झालेल्या या अनुचित प्रकारामुळे शहरभर चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT