पूनम देशमुख
कोल्हापूर ःभारतीय टपाल खात्याने 1 ऑक्टोबरपासून एक महत्त्वपूर्ण बदल करत पारंपरिक रजिस्टर पोस्ट सेवा बंद केली आहे. आता ही सेवा स्पीड पोस्टमध्ये समाविष्ट करण्यात आली असून, ग्राहकांना अधिक जलद आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे. याशिवाय पार्सल वितरणासाठी ओटीपी (वन टाईम पासवर्ड) आधारित नवी सुरक्षा प्रणाली लागू करण्यात आली आहे.
हे बदल केवळ तांत्रिक नसून, डिजिटल युगाशी सुसंगत आणि ग्राहकाभिमुख आहेत. यामुळे टपाल खात्याच्या सेवा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि तत्पर होणार आहेत. भारतीय टपाल खात्याने एक ऐतिहासिक वळण घेत डिजिटल परिवर्तनाची कास धरली आहे. पारंपरिकतेला निरोप देत स्पीड, सुरक्षा आणि स्मार्ट सेवा देण्याच्या दिशेने टपाल खात्याने घेतलेली ही झेप निश्चितच उल्लेखनीय आहे.
1850 पासून अस्तित्वात असलेल्या रजिस्टर पोस्ट सेवेने दीर्घकाळ आपली विश्वासार्हता जपली होती. बँका, न्यायालये, विद्यापीठे आणि शासकीय व्यवहारांसाठी ती एक महत्त्वाची सेवा मानली जात होती. मात्र, तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीपुढे ही सेवा मागे पडू लागली आणि ई-कॉमर्स, डिजिटल कम्युनिकेशन व खासगी कुरिअर कंपन्यांच्या स्पर्धेत रजिस्टर पोस्टने अखेर निरोप घेतला.
पार्सल पोहोचल्यावर प्राप्तकर्त्याला त्याच्या मोबाईलवर ओटीपी प्राप्त होईल आणि तो ओटीपी दाखवल्यानंतरच पार्सल वितरित केले जाईल. यामुळे चुकीचे वितरण टळेल तसेच फसवणुकीला आळा बसेल. पर्यायाने ग्राहकांचा विश्वास वाढेल.
आजच्या वेगवान युगात तंत्रज्ञानाशी सुसंगत सेवा देणे गरजेचे आहे. रजिस्टर पोस्ट सेवा ही आता स्पीड पोस्टमध्ये दिली जाणार आहे आणि ओटीपी आधारित प्रणालीमुळे पार्सल सेवा अधिक सुरक्षित व जलद झाली आहे.- वैभव वाघमारे, प्रवर अधीक्षक, कोल्हापूर डाकघर