कोल्हापूर : शक्तिपीठविषयी तुम्हाला काही माहिती नाही. नागपूर, गोव्याच्या विकासाच्या गप्पा मारण्याऐवजी शहराच्या विकासावर बोला. शक्तिपीठ महामार्गात तुमची जमीन जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला झळ पोहोचणार नाही. म्हणून सरकारची सुपारी घेऊन तुम्ही कोल्हापूरला देशोधडीला लावू नका, असा आरोप आ. राजेश क्षीरसागर यांच्यावर इंडिया आघाडीच्या बैठकीत करण्यात आला. एकूणच बैठकीत आ. क्षीरसागर यांना लक्ष्य करण्यात आले.
शक्तिपीठ महामार्ग व अलमट्टीमुळे कोल्हापूर शहरावर, जिल्ह्याला महापुराचा धोका या संदर्भात काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयात बैठक झाली. कुणाच्या तरी हितासाठी भाजप शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प राबवित आहे. शेतकर्यांची थगडी बांधून त्यावर भाजप सरकार इमले बांधत असल्याचा आरोपही यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला. शक्तिपीठ रद्द करण्यासाठी आता रस्त्यावर आरपारची लढाई लढण्याचा निर्धारही करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे म्हणाले, शहराचे प्रश्न न सोडविता आ. क्षीरसागर यांनी महामार्गाच्या समर्थनार्थ घेतलेली भूमिका चुकीची आहे. साठ शेतकरी तुमच्या पाठिशी तर आमच्या मागे हजारो शेतकरी आहेत. तुम्ही समर्थकांची यादी प्रसिद्ध करावी. महामार्गामुळे शहर पाण्याखाली जाणार आहे.
संजय पवार म्हणाले, पैसा विरुद्ध जनता, शेतकरी अशी ही लढाई आहे. त्यात कोल्हापूरचे आमदार हे जनतेच्या बाजुने लढण्याऐवजी विरोधात लढतात हे दुर्दैव आहे. आमदारांनी कोल्हापूरच्या विकासाचे काय केले सांगावे. कावळा नाका येथील सरकारी जमिनीसह इतर ठिकाणच्या सरकारी जमिनी काहींनी बळकावल्या असून त्याविरुद्ध आ. सतेज पाटील व खा. शाहू महाराज यांनी सभागृहात आवाज उठवावा. भारती पोवार यांनी आ. क्षीरसागर यांनी सरकारची सुपारी घेऊन शक्तिपीठ महामार्गाला समर्थन दिल्याचा आरोप केला.
बैठकीत राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, उदय नारकर, अतुल दिघे, हसन देसाई, बाबासाहेब देवकर, दिलीप पवार आदींची भाषणे झाली. यावेळी आर. के. पोवार, राजेश लाटकर, बाबुराव कदम, कॉ. रघुनाथ कांबळे, चंद्रकांत यादव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, व्यंकाप्पा भोसले, मधुकर रामाणे, सुभाष देसाई आदींसह इतर उपस्थित होते.
जागतिक बँकेकडून कोल्हापूर, सांगलीतील पूर नियंत्रणासाठी 3200 कोटींचे कर्ज मंजूर झाले आहे. त्याचा डीपीआर शासनाने प्रसिद्ध केलेला नाही. वास्तविक त्या रकमेतून पूर नियंत्रणाऐवजी गटार केली जाणार आहेत आणि भिंती घालण्याचे काम केले जाणार असल्याचा आरोपही बैठकीत अनेकांनी केला.
शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूर शहर धोक्यात येणार आहे. महापुरातून कोल्हापूरला वाचवा, याच्या जनजागृतीसाठी 32 प्रभागांतील नागरिकांचा मेळावा घेण्यात येईल. शेतकर्यांच्या विरोधात भूमिका घेणार्या आ. क्षीरसागर यांना जाब विचारू, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी सांगितले.
गांधी मैदानात टाकाऊ गाद्या, चादरी टाकल्याने पाणी तुंबते, असा शास्त्रज्ञांसारखा शोध आ. क्षीरसागर यांना लावला आहे. ते महान शास्त्रज्ञ आहेत. त्यांना कर्नाटक सरकारने तिकडे घ्यावे आणि गाद्या, चादरी टाकून पाणी अडवून धरणे बांधावीत, अशी टीका ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली. संजय पवार यांनी आपण इंडिया आघाडीसोबत असून काही कार्यक्रमामुळे आंदोलनाला येऊ शकलो नसल्याचे सांगितले; मात्र सच्चा शिवसैनिक असल्याने अन्याय होईल तेथे मी सर्वात पुढे असेन, असे सांगितले.