कोल्हापूर : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसर्यांदा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला लोळवल्यानंतर कोल्हापुरातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी रात्री जल्लोष झाला. नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानला धूळ चारत, भारताने विजयोत्सव साजरा केल्याने कोल्हापूरकरांच्याही आनंदाला उधाण आले. यामध्ये पर्यटक, भाविकही सहभागी झाले होते.
विजय निश्चित होताच तरुणांनी तिरंगा घेऊन मोटारसायकलवरून फेर्या सुरू केल्या. दुचाकीचे हॉर्न वाजवत, घोषणा देत, तरुणांचे जथ्ये रात्री साडेअकरा वाजल्यापासून छ. शिवाजी चौकाच्या दिशेने येत होते. काही वेळातच छ. शिवाजी चौक गर्दीत हरवून गेला. भारत माता की जय, वंदे मातरम्, जय भवानी जय शिवाजी, जय श्रीराम अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त होता.