कोल्हापूर

स्त्री-भ्रूणहत्येत लुटारूंच्या टोळ्या; पैशासाठी खुडतात निष्पाप कळ्या

Arun Patil

[author title="दिलीप भिसे" image="http://"][/author]

कोल्हापूर : जिल्ह्यात स्त्री-भ्रूणहत्यांच्या वाढत्या घटना काळजावर घाव घालणार्‍या आहेत. गर्भलिंग निदान तपासणी सेंटरवरील छापे, उच्चशिक्षित पांढरपेशांचा सहभाग, आर्थिक लोभातून एजंटांची साखळी आणि उमलण्यापूर्वीच कळ्यांच्या हत्यांमुळे जिल्ह्याच्या वैभवाला धक्का पोहोचत आहे. भविष्यात आणखी किती कळ्यांची अमानुष हत्या होणार, असा संतप्त सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

कोल्हापूर शहर, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी, कागल तालुक्यांसह इचलकरंजी परिसरात दोन-अडीच वर्षांत गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपात करणार्‍या सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश करून बोगस डॉक्टरांसह तीसपेक्षा अधिक एजंट, दलालांना बेड्या ठोकल्या. करवीर पोलिसांनी आणखी एका टोळीचा पर्दाफाश करत डॉक्टरसह तीन एजंटांना जेरबंद करून सोनोग्राफी मशिनही हस्तगत केले आहे.

सीमाभागातही गोरखधंदा

राधानगरी, भुदरगडसह सीमाभागातील किमान आठ-दहा बोगस डॉक्टरांसह 25 पेक्षा अधिक एजंटांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयात दोषारोप दाखल होण्यापूर्वी त्यांचे कारनामे पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत. सीमाभागातील निर्जन ठिकाणी एजंटांद्वारे संबंधित महिलांना बोलावून आलिशान मोटारीत चायनामेड स्कॅनिंग मशिनद्वारे गर्भलिंग तपासणी केली जात आहे. पोलिसांची कारवाई झाली की काही दिवस दुकानदारी बंद केली जाते. पुन्हा जागा बदलून कमाईचा गोरखधंदा सुरू होतो.

गतवर्षी क्रांतिसिंह नाना पाटीलनगर म्हाडा कॉलनीतील एका घरात टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. मुलगा होण्यासाठी एक लाख रुपयाचे औषध देणार्‍या बोगस डॉक्टरसह तीन संशयितांचा रॅकेटमध्ये समावेश होता. त्यात बालिंगा (ता. करवीर) येथील बोगस डॉक्टरचा समावेश होता. बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील बाजारपेठेतील एका हॉस्पिटलवर तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांनी छापा टाकून बेकायदेशीर गर्भपात आणि उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांचा साठा हस्तगत केला होता.

चार पैशांची कमाई, निष्पाप कळ्यांचा बळी

मुख्य संशयित डॉ. हर्षल नाईक-परुळेकर (गंगा लॉनजवळ, फुलेवाडी रिंगरोड) याच्यासह विजय कोळसकर याच्या कारनाम्यांची अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेतली आहे. घसघशीत कमिशनचे आमिष दाखवून एजंटांची कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह कर्नाटकात मोठी साखळी कार्यरत केली असावी, असाही संशय आहे. एका रुग्णामागे 70 ते 80 हजाराची लूट केली जाते. त्यापैकी 18 ते 20 हजार रुपये एजंटांना कमिशन दिले जाते. घसघशीत कमिशनामुळे एजंटांच्या मिळकतीचा गोरखधंदा वाढला आहे. परिणामी अनेक कोवळ्या, निष्पाप कळ्या गर्भातच खुडल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT