कोल्हापूर : कुस्ती, कबड्डी सारखे खेळ, निसर्ग सौंदर्य, श्री अंबाबाई, श्री जोतिबा यासारखी तीर्थस्थळे, इचलकरंजीचा कापड उद्योग, हुपरीचा चांदी उद्योग, कोल्हापुरी गूळ, चप्पल यासह अनेक कृषी उत्पादने, हस्तकला असा मोठा लौकिक असलेल्या कोल्हापूरला जागतिक नकाशावर प्रमोट करण्यासाठी त्याचे ब्रॅण्डिंग आवश्यक आहे. त्यासाठी विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक वाढवा, अशी सूचना राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मंगळवारी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यपाल वर्मा यांना जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी वर्मा म्हणाले, सुदृढ समाज आणि निकोप समाजमन घडविण्यासाठी नशा मुक्त भारत आणि टीबी मुक्त भारत ही अभियाने प्रशासनाने अत्यंत व्यापकपणे राबवावी. व्यसनमुक्ती केवळ कायदे, पोलिस प्रशासन अथवा शासकीय उपाययोजनांपुरती मर्यादित नसून, निरोगी आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा, कुटुंबाचा आणि समाजाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. नशा मुक्त पिढी घडविणे हे मोठे आव्हान आहे. समाजातील खेळाडू , कलाकार, प्रभावी व्यक्तिमत्वांनी जनजागृती व प्रबोधनासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी महामार्ग विकास, राज्यस्तरीय रस्ते विकास, विमानतळ विस्तार, सांस्कृतिक वारसा आणि तीर्थक्षेत्र विकास, श्री महालक्ष्मी अंबाबाई विकास आराखडा, श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखडा, शिक्षण, संशोधन आणि प्रशासन यामधील विविध उपक्रम, वैद्यकीय पायाभूत सुविधा, पूर नियंत्रण आणि प्रदूषण मुक्तीसाठीचे प्रकल्प, प्रस्तावित कोल्हापूर आयटी पार्क, पवणार ते पत्रादेवी शक्तीपीठ महामार्ग, विभागीय क्रीडा संकुल आधुनिकीकरण आणि विस्तार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, रिंग रोड व चार पदरी उन्नत मार्गीका, वैभववाडी- कोल्हापूर रेल्वे मार्ग प्रकल्प आदींचे सादरीकरण केले.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, राजर्षी शाहू खासबाग मैदान, राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ, मेकॅनिकल कार पार्किंग, रंकाळा म्युझिकल फाऊंटन, ॲस्ट्रो टर्फ हॉकी स्टेडियम, श्री अंबाबाई मंदिर पार्किंग आणि भक्तनिवास यासह शहराच्या विविध सौंदर्यकरणाचे उपक्रम, कोल्हापूर इलेव्हेटर कॉरिडॉर, घनकचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया प्रकल्प, जीआयएसबेस्ड मालमत्ता सर्वे आदी विषयांबाबतचे सादरीकरणी केले. प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील जिल्हा परिषदेचे विविध उपक्रम, पिजीआय ग्रेडिंग, समृद्ध शाळा पिंक रूम उपक्रम याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादरीकरण केले.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू राजनिश कामत, राज्यपालांचे परिसहायक नवदीप अगरवाल, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील आदींसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.