कोल्हापूर

कोल्हापूर : ‘राजाराम’च्या कार्यक्षेत्रात नवीन 55 गावांचा समावेश

Arun Patil

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावे वाढविण्याचा व कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याचा ठराव कारखान्याच्या 39 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला. यामुळे राजाराम कारखाना कार्यक्षेत्रात आणखी 55 गावांची भर पडणार आहे. दरम्यान, सहवीजनिर्मिती व उपपदार्थ उत्पादनातून सभासदांना इतर कारखान्यांच्या तुलनेत दर देता येईल, यासाठी कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्प 18 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचा मानस असल्याचे कारखान्याचे चेअरमन माजी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक होते.

40 मिनिटे चाललेल्या राजाराम कारखान्याच्या सभेत सर्व विषय मंजूर करण्यात आले. समर्थकांच्या घोषणांनी सभास्थळ दणाणून गेले. सत्ताधार्‍यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे न देता सभा गुंडाळल्याचा आरोप करत विरोधकांनी समांतर सभा घेतली.

निवडणुकीनंतर या कारखान्याची शुक्रवारी पहिलीच सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. विरोधकांनी या सभेची जोरदार तयारी केली होती. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. सभेसाठी सत्तारूढ आणि विरोधक दोन्ही गटांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. दोन्ही गटांतील टोकाचा संघर्ष पाहून सभेच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सत्ताधारी समर्थक सभासदांनी सकाळी दहा वाजताच सभागृह फुल्ल भरले होते. शुगर मिल कॉर्नर येथे जमून घोषणा देत विरोधी आघाडीचे सभासद सभेच्या ठिकाणी आले. सभास्थळाजवळ कारखान्याचे चेअरमन माजी आमदार अमल महाडिक व संचालक आणि विरोधक समोरासमोर आल्याने जोरदार घोषणाबाजी झाली. या गोंधळातच सभेला सुरुवात झाली.

विरोधक कार्यक्षेत्र वाढीला चुकीच्या पद्धतीने विरोध करत आहेत. शहरामध्ये कारखाना असल्यामुळे कार्यक्षेत्रातील अनेक गावांमध्ये नागरीकरण वाढले आहे. कार्यक्षेत्रातील अनेक गावांमधून हायवेचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात क्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे ऊस क्षेत्र कमी झाले आहे. म्हणून गावातील ऊस उत्पादकांच्या मागणीनुसार कार्यक्षेत्र वाढविण्याचा ठराव केला आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातील काही गावांचा समावेश होणार आहे. कारखान्याच्या 13 हजार पैकी 2 हजार 600 सभासद मयत आहेत, उर्वरित सभासदांपैकी नऊ हजार सभासदांचा ऊस कारखाना गळितासाठी आणतो. तो वाढविण्यासाठी महसुली पुराव्यासह कारखान्याकडे सभासद होण्यासाठी अर्ज केल्यास संचालक मंडळाच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी घेण्यात येईल, असे महाडिक यांनी सांगितले.

साखरेचा किमान विक्री दर 3,100 वरून 3,600 रुपये प्रतिक्विंटल करावा, पीक विमा योजनेमध्ये उसाचा समावेश करावा, महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीमुळे अपेक्षित गाळप होऊ शकणार नसल्याने कारखान्यांनी हंगामाच्या तयारीकरिता घेतलेल्या कर्जाचे हप्ते परतफेडीस किमान दोन वर्षांची मुदतवाढ व व्याजासाठी अनुदान द्यावे, इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी दीर्घ मुदतीचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे. सहवीजनिर्मिती प्रकल्पातील विजेचा खरेदी दर किमान 6 रुपये प्रतियुनिट करावा आदी मागण्या करत 18 महिन्यांमध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस असल्याचे सांगितले.

विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी सुरू करताच 'मंजूर… मंजूर'च्या घोषणांनी सत्ताधारी समर्थकांनी सभामंडप दणाणून सोडले. कारखान्याच्या सभासदांनी उपस्थित केलेल्या 26 प्रश्नांची उत्तरे कार्यकारी संचालकांनी दिली. सभेस कारखान्याचे व्हा. चेअरमन नारायण चव्हाण, संचालक दिलीप पाटील, दिलीप उलपे, तानाजी पाटील, डॉ. एम. बी. किडगावकर, सर्जेराव पाटील-बोने, माजी नगरसेवक सत्यजित कदम, सचिव उदय मोरे यांच्यासह सर्व संचालक, सभासद, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी चेअरमन शिवाजी पाटील यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT