अंबाबाईला अर्पण फुलांपासून दिव्यांग मुलींनी बनवल्या धूपकांडी Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur | अंबाबाईला अर्पण फुलांपासून दिव्यांग मुलींनी बनवल्या धूपकांडी

निर्माल्याच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे होतेय कौतुक; मंदिरातून रोज 50 किलो निर्माल्याचे संकलन

पुढारी वृत्तसेवा

अनुराधा कदम

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मंदिरातील निर्माल्याला सुगंधी दरवळ देण्याचे व्रत घेतले आहे, चेतना व्यवसाय प्रशिक्षण व उत्पादन केंद्रातील 13 मुलींनी. बौद्धिक अक्षम असलेल्या या मुली निर्माल्यातील फुलांपासून धूपकांडी बनवत आहेत. सध्या 10 हजार धूपकांडी बनवण्यात आल्या आहेत. भक्ती, पर्यावरणसंवर्धन आणि सामाजिक संदेश या संकल्पनेतून तयार होत असलेला निर्माल्याचा धूप घराघरांत दरवळत आहे. अंबाबाई मंदिरात रोज हजारो किलो फुले वाहिली जातात. दुसर्‍या दिवशी निर्माल्य वाहत्या नदीत सोडले जात होते.

या निर्माल्यापासून नैसर्गिक आणि सुगंधी धूप तयार करण्याबाबत चेतना अपंगमती विद्यालयाने पुढाकार घेतला आहे. आता याच निर्माल्याला नवनिर्मितीचा गंध आला आहे. चेतना शाळेतील बौद्धिक अक्षम मुलांसाठी विविध कार्यशाळा आहेत. या कार्यशाळांच्या माध्यमातून निर्माल्यापासून धूपकांडी तयार करण्याचे काम सुरू झाले. गुलाब आणि निशिगंध सुगंधातील धूपकांडीला विशेष मागणी आहे. रोजच्या निर्माल्य संकलनापासून धूपकांडी बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. चेतना प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापकीय अधीक्षक कृष्णात चौगले आणि शिक्षिका उज्ज्वला भिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उपक्रमामुळे विशेष मुलींना स्वावलंबन आणि आत्मविश्वास याचेही धडे मिळत आहेत.

निर्माल्य ते धूप...असा होतो सुगंधी प्रवास

अंबाबाई मंदिरातील निर्माल्य चेतना शाळेतील कामायनी या दालनात आणून निशिगंध, गुलाब, गलाटी, झेंडू या फुलांच्या पाकळ्यांचे वर्गीकरण केले जाते. त्यानंतर या पाकळ्या सुकवून त्यांची पावडर केली जाते. या पावडरपासूनच सुगंधी धूपकांडी तयार होते. तयार झालेल्या धूपकांडी सुकल्या की त्यांचे पॅकिंग केले जाते. सामाजिक संस्था, कार्पोरेट कंपन्या, स्थानिक नागरिक यांच्याकडून धूपकांडी खरेदी केल्या जातात. त्यामुळे अंबाबाईच्या निर्माल्याचा सुगंध ठिकठिकाणी दरवळत आहे. पर्यावरण संवर्धनही होते आणि दिव्यांग मुलींच्या हातालाही काम मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT