कोल्हापूर : ब्राह्मण पुरोहित संघाच्या मुख्य कार्यालय उद्घाटनप्रसंगी मंंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करताना संघाचे पदाधिकारी.  Pudhari File Photo
कोल्हापूर

प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सामान्य माणसाला समजावून सांगणे, ही काळाची गरज

मंत्री चंद्रकांत पाटील; जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : धर्म म्हणजे काय? जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे सर्व विधी का व कशासाठी? त्यामागील तत्त्वज्ञान काय? आदी बाबी सामान्य माणसाला सोप्या भाषेत समजावून सांगितल्या, तर आपली प्राचीन संस्कृती आणखी समृद्ध होईल, असे प्रतिपादन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या मुख्य कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

मंत्री पाटील म्हणाले, यज्ञयाग, वेदमंत्रांचे पठण आदींद्वारे मानसिक शांती व सकारात्मक ऊर्जा लाभते. संघाच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील धर्म साहित्य मराठीमध्ये आणून त्याचे मर्म समाजापर्यंत पोहोचवावे. मंत्री पाटील यांच्या हस्ते अंबाबाई, भगवान परशुराम, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज व पेंडसे शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. महालक्ष्मी वेद वेदांग पाठशाळेतील आचार्य सुधाकर काजरेकर व विद्यार्थ्यांनी वेदमंत्रांचे पठण केले. चंद्रकांत पाटील व सौ. अंजली पाटील यांच्या हस्ते संघाच्या कोनशिलेचे अनावरण झाले. उपाध्यक्ष सचिन पितांबरे यांनी स्वागत केले. अमोघ भागवत यांनी प्रास्ताविक केले.

संघाचे अध्यक्ष प्रसाद निगुडकर यांनी संघ स्थापनेचा उद्देश, वेद वेदांग पाठशाळेतून घडवलेले विद्यार्थी याची माहिती दिली. चारही वेद, स्तोत्रवर्ग, उपनिषदे, ज्योतिषशास्त्र आदी विषय शिकवत असल्याचे सांगितले. प्राचीन कोल्हापुरात वेद - वेदांतशास्त्राला राजाश्रय होता. तसा मंत्री पाटील यांच्या नेतृत्वात पुन्हा प्राप्त व्हावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. अध्यक्ष निगुडकर यांनी पुणेरी पगडी व मानपत्र देऊन चंद्रकांत पाटील यांचा सन्मान केला. यावेळी संघाचे सचिव नीलेश कुलकर्णी, नरेंद्र खासबारदार, अजित ठाणेकर, राहुल चिकोडे, श्रीकांत लिमये, विनोद डिग्रजकर, राजू मेवेकरी, सर्व संचालक व सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केले. आभार संदीप निगुडकर यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT