कोल्हापूर : दहशतीच्या बळावर गुंडागर्दी आणि अस्थिरता निर्माण करणार्या फाळकूट गुंडांवर कोल्हापूरसह परिक्षेत्रात प्रतिबंधात्मक कारवाईसाठी प्रभावी मात्रा लागू करण्याचे निर्देश असतानाही स्थानिक पातळीवर मात्र कागदोपत्री मेळ घालण्याचा प्रकार दिसून येतो. 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये परिक्षेत्रात 76 हजार 684 गुंडांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 13 टोळ्यांमधील 162 गुंडांना मोका कायद्यांतर्गत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, तरीही फाळकूट गुंडांच्या कारनाम्यांचा आलेख वाढतच राहिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत कोल्हापूर, सांगलीसह पाचही जिल्ह्यांत संघटित गुन्हेगारी टोळ्यांसह समाजकंटकाविरुद्ध विशेष मोहीम राबविण्याचे प्रभारी पोलिस अधिकार्यांना निर्देश देण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिकार्यांच्या सूचनांचा प्रत्यक्षात कितपत प्रभावी अंमल होतो हा कळीचा मुद्दा आहे. सामाजिक स्वास्थ बिघडविणार्या समाजकंटकांविरुद्ध 2022 मध्ये 71 हजार 794 तर 2023 मध्ये 76 हजार 684 प्रतिबंध कारवाईची नोंद आहे. गतवर्षीच्या तुलनेत 4 हजार 890 कारवाईने त्यात वाढ आहे. दोन वर्षातील कारवाईची संख्या लक्षणीय असली तरी वाढत्या गुंडा गर्दीवर त्याचा परिणाम दिसून येत नाही.
गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या समाजकंटकांना महाराष्ट्र पोलिस कायदा कलम अतर्गंत शहर, जिल्ह्यातून वर्ष- दोन वर्षासाठी हद्दपार करण्याची तरतूद आहे. याबाबत पोलिस अधीक्षक आणि प्रांताधिकारी निर्णय घेवू शकतात. मात्र गेल्या दोन वर्षात प्रांताधिकारी कार्यालयाकडे दाखल बहुतांशी प्रस्ताव प्रलंबित आहेत. 2023 मध्ये कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गंत 320 प्रस्ताव दाखल आहेत. त्यापैकी साधारणत: 190 पेक्षा जादा प्रस्ताव दप्तर दिरंगाईत अडकून पडले आहेत.