कोल्हापूर : शहरात प्रवेश करणारे प्रमुख रस्ते, शहरातील प्रमुख चौक अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहेत. कोणीही यावे व रस्त्यावर टपरी, हातगाडी लावून बिनधास्त व्यवसाय करावा, असेच चित्र प्रत्येक रस्त्यावर, चौकात दिसत आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी कमी आणि व्यवसायायाठीच जास्त वापरले जात आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून मात्र कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. या विभागाचे अस्तित्व संपल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे कारवाई थंडच आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी तर होतेच; शिवाय नागरिकांना चालायलाही जागा मिळत नाही.
गेल्या काही दिवसात तावडे हॉटेल ते कावळा नाका येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. शहरात प्रवेश करणारा हा प्रमुख रस्ता; पण येथे होणार्या अतिक्रमणांकडे कानाडोळा केला जात आहे. दिसली रिकामी जागा की, टाक टपरी आणि कर व्यवसाय, अशी स्थिती येथे आहे. कोणाच्या आशीवार्दामुळे ही अतिक्रमणे वाढली आहेत हे बघून महापालिकेने कारवाई करायला हवी.
राजाराम कॉलेज चौकात केएसबीने उभ्या केलेल्या गार्डनशेजारी मोठ्या प्रमाणात हातगाड्या लागल्या आहेत. खाद्यपदार्थ खाण्यासाठी येथे रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. दुचाकी, चारचाकीचे पार्किंग रस्त्यावरच केले जाते. हा जुना हायवे आहे. त्यामुळे वाहतुकीची वर्दळ मोठी असते. या अतिक्रमणावर हातोडा मारला की, एक-दोन दिवस व्यवसाय बंद होतात. पुन्हा ये रे माझ्या मागल्या. हीच परिस्थिती सायबर चौक, राजारामपुरी येथे पाहायला मिळते. शहरातील एकही चौक, प्रमुख रस्ता अतिक्रमणमुक्त नाही.
शहरातील प्रमुख बाजारपेठ असणार्या महाद्वार रोड, ताराबाई रोड, लक्ष्मीपुरी, लुगडी ओळ, लक्ष्मी रोड, भवानी मंडप ते बिंदू चौक कारागृह रस्ता येथे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमणे वाढत आहेत. प्रमुख वाहतुकीला अडथळा होत आहे. रस्त्यावर अतिक्रमणधारकांचेच राज्य असल्यासारखी स्थिती आहे. पार्किंगच्या जागाही व्यापून टाकतात. भाऊसिंगजी रोडवर अडथळा भाऊसिंगजी रोड या प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीला फेरीवाले, हातगाड्यांचा अडथळा होता. वाहतूक शाखेकडून रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकींवर कारवाई होते. हातगाड्या टपर्या यांच्यावर मात्र कारवाई होत नाही.
महापालिकेत तत्कालीन आयुक्त म्हणून द्वारकानाथ कपूर यांनी सुरुवातीला रस्ते रुंदीकरण करून शहराचा चेहरा बदलला. अनेक महत्त्वाची अतिक्रमणे काढून त्यांनी रस्ता अतिक्रमणमुक्त केला. त्यानंतर राजगोपाल देवरा आणि विजय सिंघल यांनी देखील अतिक्रमण निर्मूलनाच्या मोठ्या कारवाया केल्या. स्टेशन रोडसारखा अरुंद रस्ता देवरा यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे रिकामा व रुंद झाला. सध्या अशा प्रकारच्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईची गरज आहे.
अतिक्रमण निर्मूलन पथकाकडे स्टाफ नाही. एक मुकादम आणि चारच कर्मचारी यांच्या जीवावर हा विभाग कार्यरत आहे. मी अतिक्रमण निर्मूलन पथकाचा प्रमुख असलो तरी माझ्याकडे अन्य दोन विभागांचाही कार्यभार आहे. त्यामुळे कारवाई करताना अडचणी आहेत. तरीदेखील क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, जवाहरनगरकडून आर. के. नगरकडे जाणार्या चौकात मोठी कारवाई आम्ही केली आहे.विलास साळुंखे, अतिक्रमण निर्मूलन