अघोरी कृत्यांमुळे जांभळी हादरले, बाभळीच्या झाडाला २ महिला आणि तरूणाच्या फोटोला खिळे मारून... File Photo
कोल्हापूर

अघोरी कृत्यांमुळे जांभळी हादरले, बाभळीच्या झाडाला २ महिला आणि तरूणाच्या फोटोला खिळे मारले अन्...

एकाच महिन्यात पाच ठिकाणी जादूटोणा, करणी बाधेचा प्रकार उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण/बिरू व्हसपटे :

जांभळी (ता. शिरोळ) येथे गेल्या महिन्याभरापासून पाच वेगवेगळ्या ठिकाणी जादूटोण्याचे प्रकार उघडकीस आले. या प्रकारांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीने खळबळ उडाली आहे. बाभळीच्या झाडाला दोन महिला व एका तरुणाचे फोटो खिळे मारून अडकवून ठेवण्यात आले होते. तसेच ठोकलेल्या काळ्या बाहुल्या, बिब्बे, लिंबू आणि जादूटोणा करण्यासाठीचे साहित्य आढळून आल्याने स्थानिक नागरिकांत भीतीने खळबळ उडाली आहे. शिवाय बारा ते तेरा नारळांना एकत्र बांधून प्रत्येक नारळाला नावांची चिट्ठी दोऱ्याने बांधून हे साहित्य पूजण्यात आले असल्याचे निदर्शनास आल्याने अनेकांना धडकी भरली आहे. केवळ अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

येथील ऑक्सीजन पार्क शेजारील बाभळीच्या झाडाला दोन महिलांसह एक तरुण व लहान बाळाचा अर्धवट स्वरूपातील फोटो खिळे मारून अडकविण्यात आला होता. शिवाय काळ्या बाहुल्या, लिंबूला सुई आणि टाचण्या टोचण्यात आल्याचे निदर्शनास आले. यावेळी गावातील एका सर्पमित्राने लोक घाबरतील या भीतीपोटी हे टांगण्यात आलेले साहित्य बाजूला फेकून दिले.

दरम्यान येथील स्मशान भूमी शेजारी असणाऱ्या रस्त्याच्या बाजूला अशा प्रकारचा अघोरी प्रकार केल्‍याची घटना उघडकीस आली. त्याचबरोबर जांभळी यड्राव रस्त्यावरील एका शाळेनजीक बारा ते तेरा नारळांना एकत्र दोऱ्याने बांधून प्रत्येक नारळावर अनेकांची नावे लिहून त्या नारळांचे पूजन करून रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आले आहे. या सातत्याने होणाऱ्या अघोरी कृत्यामुळे जांभळी गाव हादरले आहे.

बरेवाईट करण्याच्या उद्देशाने हा अघोरी प्रकार करण्यात आल्याची धारणा स्थानिक नागरिकांची झाल्याने त्यांच्यात गेल्या महिना भरापासून भीतीचे वातावरण पसरले होते. या प्रकारची ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन गावातील प्रत्येक मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. तसेच यापुढे असे अघोरी प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कडक पाऊले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे.

अंधश्रद्धेमुळे अघोरीकृत्यांचे पीक जोमात

अंधश्रद्धेमुळेअंधश्रद्धेमुळे अघोरीकृत्यांचे पीक जोमात अशा आघोरी कृत्यांचे पीक सर्वत्र जोमात येताना दिसत आहे. भोंदू लोकांच्या नादी लागून पैशाची नासाडी करत अनेक लोक बळी पडत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अंधश्रद्धेला बळी न पडता आपली मानसिकता सुधारण्याची गरज आहे. मानसिकता बदलली तरच अशा अघोरी कृत्यांना आळा बसेल असे जाणकार सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT