Ambabai temple | अंबाबाई मंदिरातील शिलालेखांचे ठसे घेण्यास सुरुवात 
कोल्हापूर

Ambabai temple | अंबाबाई मंदिरातील शिलालेखांचे ठसे घेण्यास सुरुवात

११ सप्टेंबरपर्यंत काम सुरू राहणार; १६ शिलालेखांचे शास्त्रीय पद्धतीने दस्तऐवजीकरण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या जतन-संवर्धनाच्या कामादरम्यान आढळलेल्या १६ शिलालेखांचे ठसे घेण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञांकडून शिलालेखांची तपासणी, प्रतिलिपी तयार करणे आणि छायाचित्रण केले जात असून, हे काम ११ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या शिलालेखांच्या अभ्यासातून मंदिराच्या इतिहासातील अनेक महत्त्वाचे संदर्भ उजेडात येण्याची शक्यता आहे.

मंदिरातील सूक्ष्म ऐतिहासिक खुणांचे शास्त्रीय पद्धतीने दस्तऐवजीकरण करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या चेन्नई येथील तमिळ शिलालेख विभागातील सहाय्यक शिलालेखतज्ज्ञ डॉ. एस. कृष्णमूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिलालेखांवरील अक्षरे, भाषा, लिपी तसेच त्यातील ऐतिहासिक संदर्भ यांचा अभ्यास केला जाणार आहे. ठसे घेण्याबरोबरच प्रत्येक शिलालेखाची प्रतिलिपी आणि छायाचित्रण करण्यात येत आहे. यामुळे शिलालेखांचे अचूक दस्तऐवजीकरण होऊन त्यांचे डिजिटल स्वरूपात जतन करता येणार आहे.

अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत पहिल्या टप्प्यात वास्तू संवर्धनाचे काम सुरू असताना मंदिर परिसरात हे १६ शिलालेख आढळले आहेत. या शिलालेखांचे भारतीय शिलालेख सर्वेक्षण विभागाकडून यापूर्वी वाचन करण्यात आले होते. आता त्यांच्या प्रतिलिपीचा भारतीय शिलालेख संग्रहातील संबंधित संदर्भांसह अभ्यास केला जाणार आहे.

ऐतिहासिक वारशाचे डिजिटल जतन

शिलालेखांवरील मजकूर, लिपी, भाषा, अक्षररचना आणि ऐतिहासिक संदर्भ यांची नोंद घेऊन त्यांचे डिजिटल दस्तऐवजीकरण केले जाणार आहे. त्यामुळे अंबाबाई मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी हा महत्त्वपूर्ण ठेवा ठरणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT