आशिष आडिवरेकर
कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणातून सहा महिन्यांपूर्वी बाहेर आलेल्या बोगस डॉक्टर स्वप्नील पाटील याने थेट लॉजवरच गर्भलिंग निदान करण्याचा पुन्हा बाजार मांडला. तपासणीचा वेग त्याने इतका वाढविला की, रविवारी (दि. २६) अवघ्या २० मिनिटांत आठ गर्भवती महिलांची तपासणी करून जणू त्याने रेकॉर्डच केले. त्यांना मुलगा की मुलगी याचाही निर्णय तातडीने देत गर्भपात करायचा असेल तर संपर्क करा, असे सांगून त्गाचे दरपत्रकच सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
तीन ते चार मोटारींचा वापर
तपासणी करून बाहेर आलेल्या स्वप्नीलला पोलिस कारवाईची कुणकुण लागली. तो भगव्या रंगाच्या एका मोटारीतून पसार झाला. यापूर्वीही तो दोनदा कारवाईतून पळण्यासाठी पोलिसांना चकवा देऊन गायब झाला आहे. जाताना सोबत पोर्टेबल सोनोग्राफी मशिनही घेऊन गेला. पोलिस मोटारीच्या नंबरवरून स्वप्नीलचा माग काढत आहेत. मात्र गर्भलिंग रॅकेटमध्ये तीन ते चार मोटारींचा वापर करण्यात आला.
तपासणीसाठी २० हजार तर गर्भपातासाठी १ लाख
स्वप्नील पाटील तपासणीनंतर मुलगी असेल तर निगेटिव्ह, मुलगा असेल तर पॉझिटिव्ह असे सांगत होता. मुलगी असल्यास गर्भपात करायचा असेल तर निरोप द्या, डॉक्टरची व्यवस्था करून देऊ, असेही सांगत होता. गर्भलिंग निदानासाठी २० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम तो उकळत होता; तर गर्भपातासाठी एक लाख रुपये लागणार असल्याचेही सांगत होता.
महिला एजंट आणि लॉजचा आधार
स्वप्नीलने पोलिस यंत्रणेला चकवा देण्यासाठी लॉजवरच गर्भलिंग निदान केंद्र थाटले होते. मात्र तरीही पोलिसांनी कारवाई करून त्याचा पर्दाफाश केला. मात्र रविवारी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये दोन महिला एजंटच सहभागी असल्याचे समोर आले. यामुळे महिलाच कळ्या खुडण्यात मध्यस्थी करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
सीमाभागातही कनेक्शन
कळंबा येथील थ्री स्टार लॉजवर टाकलेल्या छाप्यानंतर पोलिसांनी लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. यातून अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. या रॅकेटचे कनेक्शन सीमाभागातही असल्याचे समोर आले आहे. कर्नाटक परिसरातील काही महिलाही स्वप्नीलकडे तपासणीसाठी येत होत्या.