कोल्हापूर

Plastic waste burning | टाकवडे-इचलकरंजी रस्त्यावर प्लास्टिक कचरा जाळण्याचा बेकायदेशीर प्रकार; नागरिकांत तीव्र संताप!

टाकवडे हद्दीतील इचलकरंजीकडे जाणाऱ्या २०० क्रमांकाच्या राज्यमार्गावर अज्ञातांकडून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा टाकून तो पेटविण्याचा गंभीर प्रकार सुरू आहे

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण : टाकवडे (ता. शिरोळ) हद्दीतील इचलकरंजीकडे जाणाऱ्या २०० क्रमांकाच्या राज्यमार्गावर अज्ञातांकडून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा टाकून तो पेटविण्याचा गंभीर प्रकार सुरू आहे. या बेजबाबदार कृत्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी साचलेल्या प्लास्टिक कचऱ्याच्या ढिगांमुळे आणि त्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे या परिसराला प्रदूषणाचा विळखा पडला आहे.

रस्त्यालगत सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी सुमारे एक किलोमीटर लांबीची आर.सी.सी. गटार उभारण्यात आली आहे. मात्र, सध्या याच गटारीचा वापर कचरा टाकण्यासाठी केला जात आहे. याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग रचून त्यांना थेट आग लावली जात आहे.

या आगीतून निघणाऱ्या दाट आणि विषारी धुरामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना समोरील वाहने दिसणे कठीण झाले आहे. यामुळे या राज्यमार्गावर मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच, या विषारी धुराचा सर्वाधिक त्रास सायंकाळी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना, पादचाऱ्यांना आणि दुचाकी वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष; आंदोलनाचा इशारा

पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या या गंभीर प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळणारा हा प्रकार तात्काळ थांबवून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास, ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

"टाकवडे-इचलकरंजी मुख्य रस्त्यालगत टाकण्यात आलेले प्लास्टिक कचऱ्याचे ढीग ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने हटवून घ्यावेत. बेकायदेशीरपणे कचरा जाळणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी नियमित देखरेख ठेवून नागरिकांच्या आरोग्याचे आणि पर्यावरणाचे संरक्षण करावे," अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT