कुरुंदवाड : कुरुंदवाड शहरात शुक्रवारी पुरवठा विभागामार्फत व्यावसायिक गॅस सिलिंडरची छापेमारी होणार असल्याची माहिती आधीच स्थानिक गॅस एजन्सीकडे पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे महसूल प्रशासनाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, माहिती फुटण्यामागे नेमके कोणय़ याबाबत चर्चा रंगली आहे.
एका व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार, छापेमारीची माहिती एजन्सीकडूनच व्यावसायिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. गुरुवारी (दि.९) रात्री साडेआठच्या सुमारास काही हॉटेल व आस्थापन चालकांना “कोणीही घरगुती गॅस वापरू नये” अशा सूचना एजन्सीच्या हस्तकाकडून देण्यात आल्या. तपासणीपूर्वीच अशा प्रकारे अलर्ट केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
हॉटेल व इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती गॅसचा वापर नियमबाह्य असल्याचे सर्वश्रुत असले, तरी कारवाईपूर्वीच सूचना देणे हा प्रकार संशयास्पद असून या पार्श्वभूमीवर, “छापेमारीची गोपनीय माहिती बाहेर कशी पडली?” हा मुद्दा अधिकच गडद झाला आहे. या घडामोडीमागे गॅस वितरणातील संभाव्य गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न असू शकतो. व्यावसायिक सिलिंडरच्या पुरवठ्यातील अनियमितता, तसेच घरगुती गॅसचा अन्यत्र वळवला जाणारा वापर, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही केवळ तपासणी नसून, गॅस वितरण व्यवस्थेतील मोठ्या साखळीचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महसूल प्रशासनाने या प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शुक्रवारी होणाऱ्या छापेमारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.