कोल्हापूर

वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास राज्यभर लढा उभारणार : प्रताप होगाडे यांचा इशारा

करण शिंदे

किणी, पुढारी वृत्तसेवा : महावितरण कंपनी वीज ग्राहकांना लवकरच प्रीपेड मीटर्स देणार आहे. मात्र ग्राहकांवर याची सक्ती करू नये. तसेच जुन्या मीटरवर कोणताही अतिरिक्त भार लावू नये. असे झाल्यास ग्राहकांच्या वतीने राज्यभर तीव्र लढा उभारण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.

घरगुती, व्यापारी आणि कृषी पंपधारक असे मिळून राज्यात जवळपास 2 कोटी 75 लाख वीज ग्राहक आहेत. कृषी पंप वगळता 2 कोटी 24 लाख ग्राहक महावितरणच्या वीजेचा वापर करतात. सप्टेंबर 2024 पर्यंत कृषी पंप वगळता सर्वत्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. स्मार्ट मीटर्स किंवा प्रीपेड मीटर्स याचा फायदा ग्राहकांपेक्षा महावितरण कंपनी आणि वीज विक्रीच्या खुल्या बाजारात येणारे खाजगी वितरण परवानाधारक यांनाच होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने उद्याच्या काळात अनेक खाजगी कंपन्यांना वितरण परवाने दिले, तर या सर्व खर्चाचा लाभ खाजगी कंपन्यांनाच होणार आहे.

महावितरण कंपनीच्या एकूण मीटर्स प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के म्हणजे 16 हजार कोटी रुपये रक्कमेचा बोजा व्याजासह राज्यातल्या सर्व प्रामाणिक वीज ग्राहकावर पडणार आहे. त्याचा परिणाम अंदाजे प्रति युनिट प्रति युनिट 30 पैसे ते 40 पैसे दरवाढ याप्रमाणे होऊ शकेल. एवढे सगळे करूनही गळती कमी होतील. गळतीच्या नावाखाली सुरू असलेल्या चोऱ्या कमी होतील, याची शक्यता शून्य आहे. त्यामुळे केवळ सरकार आणि कंपन्या यांच्या हितासाठीच ही योजना आहे, असे दिसते. ग्राहकांनी प्रीपेड मीटर्स नाकारले तर त्यांचे सध्याचेच मीटर्स चालू ठेवले पाहिजेत.

ग्राहकांच्या मीटर्सवर कर्ज व्याज बोजा लावू नये. ग्राहकाने पोस्टपेड पर्याय स्वीकारला तर, त्याला त्वरित मान्यता दिली पाहिजे, अशी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेची भूमिका आणि मागणी असल्याचे प्रताप होगाडे यांनी सांगितले. सक्ती न होण्यासाठी आणि सक्ती झालीच तर याविरोधात आंदोलन उभारण्यात येणार आहे. याबद्दलच्या सूचना वीज ग्राहक संघटना ,वीज ग्राहक यांनीही कराव्यात असे आवाहन प्रताप होगाडे यांनी केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT