कोल्हापूर : काँग्रेस कमिटी येथे जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कारानंतर नेत्यांनी एकत्र येत शक्तिप्रदर्शन केले. यावेळी खासदार शाहू महाराज, राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, राजू आवळे, मालोजीराजे, जयंत आसगावकर, ए. वाय. पाटील, संजय पवार आदी.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

महायुतीत राष्ट्रवादीला मोठ्या भावाचा मान नसेल, तर आम्ही देऊ : आ. सतेज पाटील

जिल्हा परिषदेत ‘खेळ’ करण्याचे सूचक संकेत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : महायुतीमध्ये राष्ट्रवादीला मोठ्या भावाचा मान मिळाला नाही, तर तो मान द्यायला आम्ही तयार आहोत. गरज पडली, तर जिल्हा परिषदेत राजकीय खेळ करण्याचीही आमची तयारी आहे, असे सूचक विधान विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी येथे केले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस व मित्रपक्षांच्या विजयी सदस्यांचा सत्कार काँग्रेस कमिटीत झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. शाहू महाराज होते. यावेळी आ. पाटील यांनी आगामी ‘गोकुळ’ व जिल्हा बँकेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले. आ. पाटील म्हणाले, येत्या मार्चमध्ये ‘गोकुळ’च्या रणांगणाला सुरुवात होईल. संघर्ष आपल्यासाठी नवा नाही. आता विश्रांती नाही. ‘गोकुळ’ची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविण्याची आमची तयारी आहे.

डिसेंबरमध्ये जिल्हा बँकेची निवडणूक होणार असल्याचे सांगत पाटील यांनी जिल्ह्यातील या संस्थांचे हित जपणे महत्त्वाचे आहे. त्या द़ृष्टीने प्रत्येक निवडणुकीला आम्ही सज्ज आहोत, असे स्पष्ट केले. जिल्हा परिषदेत सत्तेचे गणित सतत बदलत असल्याचा उल्लेख करत विरोधकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. खा. शाहू महाराज यांनी विरोधी पक्ष म्हणून सभागृहात सदस्यांनी चांगली कामगिरी करावी, असे सांगितले. माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्ष म्हणून सत्ताधार्‍यांना हैराण करा, सभागृह दणाणून सोडा. असे झाले, तर सत्ताधार्‍यांपेक्षा तुम्हाला विकासकामाला जादाचा निधी मिळेल, असेही ते म्हणाले.

आ. जयंत आसगावकर, माजी आ. मालोजीराजे, माजी आ. ऋतुराज पाटील, राजू आवळे, ए. वाय. पाटील, राहुल देसाई, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, चेतन नरके, शशिकांत पाटील-चुयेकर प्रकाश पाटील, पी. डी. धुंदरे, हिंदुराव चौगले, सदाशिव चरापले, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, इंद्रजित बोंद्रे आदी उपस्थित होते. स्वागत माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी केले. सूत्रसंचालन ‘गोकुळ’चे संचालक बयाजी शेळके यांनी केले. यावेळी सदस्यांचा सत्कार शाहू महाराज, राजू शेट्टी, सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

माजी आमदार राजू आवळे, ए. वाय. पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

व्यासपीठावर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्याकडे पाहत मालोजीराजे यांनी तुमचा आता कोणता गट नाही. तुम्ही काँग्रेसचेच असल्याचा उल्लेख केला. यावर सतेज पाटील यांनी ए. वाय. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असल्याचे सांगितले, तर माजी आमदार राजू किसन आवळे हे देखील काँग्रेसमध्येच असल्याचे पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT