devendra fadanvis  x
कोल्हापूर

Devendra Fadanvis | इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर लवकरच मोठा निर्णय

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : कायमस्वरूपी तोडगा काढणार

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : दोन दशकांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करणार्‍या इचलकरंजी शहरासाठीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाने निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वर्षा निवासस्थानी गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शहराच्या शाश्वत पाणी पुरवठ्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यामुळे शहराच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरच मोठा निर्णय जाहीर होण्याचे संकेत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी इचलकरंजी दौर्‍यावर असून ते कोणती घोषणा करतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

शहराला सध्या कृष्णा व पंचगंगा नळ पाणी योजनेद्वारे उपसा करून तो पुरवला जातो. मात्र पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. शहरासाठी काळम्मावाडी धरण, कुंभोज, वारणा, दूधगंगा उद्‌भव सुळकूड आदी योजनांचा पर्यायाला विरोध झाला. त्यामुळे त्या पूर्णत्वास गेल्या नाहीत. दीर्घकालीन आणि शाश्वत पर्यायासाठी आ. राहुल आवाडे यांनी पाठपुरावा केला. या अनुषंगाने फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आज खा. धैर्यशील माने, आ. राहुल आवाडे, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, आयुक्त पल्लवी पाटील, जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आदी उपस्थित होते. बैठकीत शहराच्या वाढत्या पाणी गरजा, कृष्णा नदीवरील जलस्रोत तसेच तालुक्यातील गावांच्या पाणी पुरवठ्याबाबत सादरीकरण करण्यात आले.

पाणी योजनेला दिशा मिळणार

सध्या इचलकरंजीची साडेचार लाख लोकसंख्या आहे. शहराला ४० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. मात्र प्रत्यक्षात ७० एमएलडीची गरज आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार लक्षात घेऊन २०५४ सालापर्यंत शुद्ध व मुबलक पाण्याची गरज आहे. पाणी योजनांसाठी अनेकवेळा आंदोलने झाली. मात्र विरोधामुळे योजना बारगळल्या. पाणी प्रश्नावर प्रशासकीय हालचाली गतिमान झाल्याने शहरासाठी पाणी योजनेला नवी दिशा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT