इचलकरंजी : तब्बल अडीच किलोमीटर लांबीचा तिरंगा, हातात राष्ट्रध्वज घेत नागरिकांचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि पाकिस्तानविरुद्ध तीव्र संतापासह निषेधाच्या घोषणा देत, भारतीय सैन्य दलाचे प्रोत्साहन वाढवत वस्त्रनगरी इचलकरंजीत शनिवारी भव्य ‘तिरंगा एकता रॅली’ काढण्यात आली. या माध्यमातून भारतीय जवानांना हजारोंच्या संख्येने सामूहिक सलामी देण्यात आली.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतीय सैन्याने जशास तसे उत्तर देत पाकचे कुटिल मनसुबे धुळीस मिळवले. भारतीय जवानांचे देशाप्रति असणारे योगदान अतुलनीय असून, या जवानांचे मनोबल वाढविणे हे आपले कर्तव्य असल्याने इचलकरंजीत ‘तिरंगा एकता रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस पुरवठा कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृतिस्तंभास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन महात्मा गांधी पुतळा येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. तब्बल अडीच किलोमीटर लांबीचा तिरंगा, सर्वांच्या हाती राष्ट्रध्वज व परिधान केलेल्या तिरंगी टोप्यांमुळे संपूर्ण परिसर तिरंगामय झाला होता.
रॅलीच्या प्रारंभी आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सुभेदार जयपाल कोरेगावे, भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, शहर अध्यक्ष पै. अमृत भोसले, प्रकाश दत्तवाडे, अशोक स्वामी, अहमद मुजावर, सौ. अलका स्वामी, सौ. मौसमी आवाडे, मिश्रीलाल जाजू, विजय भोजे, श्रीरंग खवरे, अनिल डाळ्या, धोंडिराम जावळे आदींसह मान्यवर होते. यावेळी सेना आणि सुरक्षा दलांना मोकळीक दिल्याबद्दल आणि पाकिस्तानला धडा शिकवल्याबद्दल लष्कर आणि सुरक्षा दलांचे, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले.
मुख्य मार्गावरून कॉ. मलाबादे चौकातून एकेरी मार्गातून श्री शिवतीर्थ येथे रॅली आल्यानंतर सुभेदार जयपाल कोरेगावे, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटक व जवानांना दोन मिनिटे स्तब्धता पाळत श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर वंदे मातरम् होऊन रॅलीची सांगता झाली. यामध्ये माजी सैनिकांसह तरुण, महिला, विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी, खेळाडू, नागरिक राष्ट्रध्वजासह मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.