इचलकरंजीतील आगीत सात कोटींचे नुकसान  
कोल्हापूर

Ichalkaranji Fire : इचलकरंजीतील आगीत सात कोटींचे नुकसान

पाच हजार सूत बाचकी खाक; आठ तासांनंतर आग आटोक्यात

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी ः येथील जय सांगली नाका परिसरात असलेल्या राशिनकर यांच्या इमारतीतील सूत गोदामाला भीषण आग लागली. या घटनेत सुमारे पाच हजार सूत बाचकी जळून खाक झाली. इमारतीचेही मोठे नुकसान झाले. या घटनेत 7 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पहाटेच्या सुमारास लागलेली आग इचलकरंजीसह अन्य ठिकाणच्या अग्निशमन दल जवानांच्या मदतीने मोठ्या शर्थीने आठ तासांनंतर आटोक्यात आली. मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेमुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

सोलगे मळा रस्त्यावर राशिनकर यांची इमारत आहे. या इमारतीत खालच्या मजल्यावर सूत गोदाम तर वरील मजल्यावर राजेंद्र राशिनकर हे राहतात. पहाटे पाचच्या सुमारास शेजाऱ्यांना गोदामाच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे दिसले. याबाबतची माहिती कळताच भागातील नागरिक जमा झाले. राशिनकर यांच्या घरी कार्यक्रमानिमित्त नातेवाईक वास्तव्यास होते. आगीच्या घटनेने त्यांची भीतीने गाळण उडाली. प्रमोद हळदकर, अरुण नलवणे, किशोर हंचाटे, गजानन साबणे आदींसह नागरिकांनी सतर्कता दाखवत राशिनकर यांच्या घरातील 4 सिलिंडर सुरक्षितस्थळी आणले. गोदामातील आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. या दरम्यान नागरिकांनी गोदामातील एका बाजूला असलेली सुमारे 100 भर सुताची बाचकी तातडीने हलवली; तर गोदामातील पिछाडीच्या बाजूस असणारी सुताची बाचकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. धुरामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत असल्याने छताचे पत्रे फोडण्यात आले. मात्र आगीची तीवता कमी होत नसल्याने जेसीबी आणि यंत्राच्या भोवतालच्या गोदामाच्या भिंती फोडण्यात आल्या.

इचलकरंजीसह कुरुंदवाड, हातकणंगले, शिरोळ तसेच दत्त सहकारी साखर कारखाना आदी ठिकाणच्या अग्निशमन दलाने शर्थीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आग धुमसत असल्याने यंत्राची मदत घेऊन आग शमवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मदतकार्यावेळी आगीची झळ बसल्याने आलम मोमीन जखमी झाले. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. सुमारे 5 हजार सुताची बाचकी व गोदामातील साहित्य जळून खाक झाले. आगीच्या तीवतेने इमारतीला तडे गेल्याने ती धोकादायक बनली आहे. घटनास्थळी नगरसेवक मदन कारंडे, मारुती पाथरवट, अमर जाधव, संजय तेलनाडे, रणजित जाधव आदींनी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT