इचलकरंजी : आर्थिक वादातून रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी तलवार, कोयत्यासह केलेल्या सशस्त्र हल्ल्यात वडिलांसह तीन भाऊ जखमी झाले. यामध्ये गौरव गणेश बागडे (वय ३५) हा युवक गंभीर जखमी झाला. गणेश अनिल बागडे, कुणाल गणेश बागडे आणि यश गणेश बागडे अशी उर्वरित जखमींची नावे आहेत. सहकारनगर साईट नं. १०२ परिसरात ही घटना घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. हल्लेखोरांनी तलवारीसह कोयते हातात घेऊन दहशत माजवल्याने भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची नोंद करण्याचे काम गावभाग पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
सहकारनगर परिसरात राहणारे गणेश बागडे आणि हल्लेखोरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वाद सुरू होता. वाद मिटवण्यासाठी गणेश बागडे व त्यांची मुले कुणाल, गौरव व यश आदी घराजवळून जात होते. याचदरम्यान तलवार, कोयता व एडका यासारखी शस्त्रे घेऊन आलेल्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. नागरिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. तत्पूर्वी, डोक्यात शस्त्राचा वर्मी घाव बसल्याने गौरव बागडे हा गंभीर जखमी झाला. हल्ल्यामध्ये गणेश, यश आणि कुणाल हेही जखमी झाले आहेत.