कोल्हापूर ः कोल्हापूर महापालिकेसाठी गुरुवारी चुरशीने मतदान झाले. मतदानासाठी महिलांचाही उत्साह दांडगा होता. शिवाजी पेठेतील एका केंद्रावर महिलांची झालेली गर्दी. (छाया ः पप्पू अत्तार) File Photo
कोल्हापूर

Municipal Elections | राज्यात सर्वाधिक इचलकरंजी ६९.७६% तर कोल्हापुरात 66.54% मतदान

मनपाच्या 557 उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेसाठी गुरुवारी मतदारांनी मतदानाचा ‘कोल्हापुरी तडका’ देत, प्रचंड चुरशीने 66.54 टक्के मतदान केले. वस्त्रनगरी इचलकरंजीतही मतदानाचा महाधमाका राहिला. पहिल्याच महापालिकेसाठी इचलकरंजीकरांनी ईर्ष्येने 69.76 टक्के मतदान केले. राज्यात मतदानाची सर्वाधिक टक्केवारी इचलकरंजीची राहिली. कोल्हापूर महापालिकेच्या 327, तर इचलकरंजी महापालिकेच्या 230 अशा एकूण 557 उमेदवारांच्या भवितव्याचा शुक्रवारी (दि. 16) फैसला होणार आहे. मतदानाचा कौल कोणाला, कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती, हे आज दुपारपर्यंतच स्पष्ट होणार आहे.

कोल्हापुरात प्रचंड उत्साहात मतदान झाले; तरी मतदान यंत्रे बंद पडल्याने मतदानासाठी झालेला विलंब, मतदारयादीत नाव नसल्याने मतदानाची वाया गेलेली संधी, अन्य मतदान केंद्रांवर नावे असल्याने मतदारांची झालेली धावपळ, यासह बोगस मतदान झाल्याच्या घटनाही घडल्या. उमेदवारांत बाचाबाची, उमेदवारांच्या पतींत एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन झालेली धक्काबुक्की, पोलिस आणि उमेदवारांत उडालेल्या शाब्दिक चकमकी, यासह कार्यकर्त्यांत झालेल्या वादावादी, त्यातून जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी केलेला सौम्य लाठीमार आदी घटनांनी ठिकठिकाणी काही निर्माण झालेले तणावाचे वातावरण वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

महापालिकेच्या 20 प्रभागांतील 81 जागांसाठी 71 अपक्षांसह 327 उमेदवारांचे भवितव्य गुरुवारी ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाले. राज्यातील महायुतीच्या घटकपक्षांनी कोल्हापुरातही एकत्र येत महायुती म्हणून निवडणूक लढवली. त्याला महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने शिवसेना ‘उबाठा’ गटाला सोबत घेत आव्हान दिले आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्षाला सोबत घेत केलेल्या तिसर्‍या आघाडी आणि भाजपचा सहयोगी असलेल्या जनसुराज्य शक्तीने रिपब्लिकन पार्टी आठवले गटाला बरोबर घेत या निवडणुकीत रंगत आणली आहे. यामुळे बहुतांशी सर्वच प्रभागांत गुरुवारी चुरशीने आणि तितक्याच उत्साहाने मतदान झाले.

सकाळपासूनच मतदारांत अनेक ठिकाणी उत्साह होता. यामुळे सकाळी साडेसात-आठ वाजल्यापासूनच काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. काही मतदान केंद्रांवर मात्र सकाळपासूनच मतदारांची संख्या तुलनेने कमीच राहिली. सकाळी 9-10 वाजल्यानंतर मात्र मतदानाचा वेग वाढला. उमेदवारांच्या स्थानिक प्रभागात, उमेदवाराचे प्राबल्य असलेल्या ठिकाणच्या मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांसह मतदारांचाही उत्साह जाणवत होता. यामुळे काही मतदान केंद्रांवर दुपारी 12 वाजल्यापासून ते 3-4 वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

शहरातील प्रमुख पेठापेठांसह काही उपनगरांतही चुरस जाणवत होती. कसबा बावडा, कदमवाडी, जाधववाडी, सदर बाजार, राजेंद्रनगर, सुभाषनगर, जरगनगर, संभाजीनगर, तपोवन परिसर, साळोखेनगर, सानेगुरुजी वसाहत, फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत आदी परिसरात ठिकठिकाणी मतदारांच्या रांगा होत्या. यावर्षी प्रथमच बहुसदस्यीय प्रभाग रचनेद्वारे मतदान होत असल्याने प्रभाग क्रमांक 1 ते 19 मधील उमेदवारांना प्रत्येकी चार, तर प्रभाग क्रमांक 20 मधील उमेदवारांना प्रत्येकी पाच मते द्यावी लागत होती. मते देताना मतदारांचा विशेषत: महिला आणि वृद्धांचा गोंधळ होत होता. अनेकांना मतदान कसे करायचे हे समजून द्यावे लागत होते. त्यातून मतदानाला विलंब होत होता.

शहरात बहुतांशी ठिकाणी कित्येक मतदारांच्या मतदान केंद्रात बदल झाले होते. कुटुंबातील काही सदस्य एका मतदान केंद्रावर, तर काहीजण दुसर्‍या केंद्रावर, अशी स्थिती होती. यामुळे केंद्र शोधणे आणि मतदान करताना अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. काही मतदारांना मतदान केंद्रावर आल्यानंतर मतदान दुसर्‍याच ठिकाणी असल्याचे समजले, यामुळे मतदान केंद्रावर पोहोचताना त्यांना धावपळ करावी लागली. वयोवृद्ध मतदारांसाठी प्रशासनाने रिक्षाची व्यवस्था केली होती, त्यातून त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणून पुन्हा घरी नेऊन सोडले जात होते. दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था केली होती, त्यावरून महापालिका कर्मचारी मतदाराला मतदान केंद्रात घेऊन जात होते.

अनेक मतदार सहकुटुंब मतदानासाठी येत होते. महिलांचा उत्साह अधिक होता. यासह नवमतदारांतही मतदानाबाबत असलेली उत्सुकता दिसत होती. मतदान केल्याची खूण दाखवत, मतदान केंद्राबाहेर सेल्फी घेण्याचा मोह अनेक नवमतदारांना आवरत नव्हता. रिक्षासह विविध वाहनांबरोबरच चालत केंद्राकडे येणार्‍या मतदारांमुळे मतदान केंद्राकडे जाणार्‍या रस्त्यांवर वर्दळ होती. यामुळे या परिसरात वारंवार वाहतुकीची कोंडी होत होती. मतदानाची वेळ संपल्यानंतरही सहा ठिकाणी मतदान सुरू राहिले. वेळ संपतानाच केंद्रांबाहेर रांगेत मतदार उभे होते, त्यांना टोकन देऊन मतदान प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली. या केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. मतदानानंतर ‘ईव्हीएम’ सील करून मतमोजणी ठिकाणी तयार केलेल्या स्ट्राँगरूममध्ये नेण्यात आली. स्ट्राँगरूमबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सत्ता कुणाची? आज फैसला

कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेवर सत्ता कुणाची, याचा फैसला मतदान संपल्यानंतर अवघ्या 15 तासांतच शुक्रवारी सकाळी दहा वाजता होणार आहे. शुक्रवारी मतमोजणी होणार असून, सकाळी 12 वाजेपर्यंत बहुतांशी सर्व चित्र स्पष्ट होईल, दुपारी एक-दोन वाजेपर्यंतच मतमोजणीची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, अशीही शक्यता आहे.

41 ची ‘मॅजिक फिगर’ कोण गाठणार?

कोल्हापूर महापालिकेच्या 81 जागांसाठी निवडणूक होत आहे. महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकावण्यासाठी 41 ही बहुमताची ‘मॅजिक फिगर’ कोण गाठणार, याबाबत उत्सुकता आहे. कोणाला किती जागा मिळणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवत अंदाज व्यक्त केले जात आहेत. मात्र, मतदार कोणाच्या बाजूने जाणार, कुणाला साथ देणार हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे. 41 ची ‘मॅजिक फिगर’ गाठत महायुती आपला झेंडा फडकावणार की काँग्रेस या सर्वांवर पुन्हा भारी पडत सत्तेची हॅट्ट्रिक साधणार हे उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

उमेदवार, कुटुंबीयांकडून स्वागत

बहुतांशी सर्वच मतदान केंद्रांवर उमेदवारांकडून, तसेच त्यांच्या कुटुंबीयांकडून मतदारांचे स्वागत केले जात होते. प्रभागातील सर्व मतदान केंद्रांवर उमेदवार भेट देत होते, त्याबरोबर नातेवाईक, प्रमुख कार्यकर्तेही भेटी देत होते. यामुळे काही उमेदवार, त्यांच्या नातेवाईकांची दमछाक होत होती.

मार्करची शाई अन् आरोप

राज्यात महापालिका निवडणुकीसाठी 2015 पासून निवडणुकीच्या शाईसाठी मार्करचा वापर केला जात आहे. या निवडणुकीतही मार्कर वापरण्यात आला. मात्र, या मार्करची शाई लगेच धुवून जात असल्याची तक्रार काहींनी केली. काही ठिकाणी मार्करची शाई योग्य प्रकारे लावली जात नसल्याचेही सांगितले जात होते. मार्करमधील शाई वाळणार नाही, याकरिता केंद्राध्यक्ष मतदान कर्मचार्‍यांनी वापर होताच मार्करला टोपण लावा, अशा सूचना देत होते.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मतदान प्रक्रियेसाठी सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या मदतील होमगार्डचे जवानही होते. किरकोळ प्रकार वगळता कोठेही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

वादावादी अन् धक्काबुक्कीही

न्यू पॅलेस परिसरातील प्रिन्स शिवाजी शाळेतील केंद्रासमोर भाजप आणि काँग्रेसच्या महिला उमेदवारांची शाब्दिक चकमक उडाली. त्यात पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. मंगळवार पेठेतील ताराराणी विद्यालय केंद्रावर दोन्ही महिला उमेदवारांचे पती एकमेकांच्या अंगावर धावून गेले, त्यातून शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला. यासह मतदान केंद्राजवळ होणारी गर्दी पोलिस सतत पांगवत होते. त्यातून न ऐकणार्‍या कार्यकर्त्यांना लाठीचा प्रसाद देत, पांगवले जात होते. काही ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांतही वादावादी होत होती, त्यात पोलिसांनाही मध्यस्थी करावी लागली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT