इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल 456 उमेदवारी अर्ज प्रक्रियेत 11 अर्ज अवैध ठरले. यामध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार विशाल सुनील धुमाळ यांचा समावेश असल्याने पक्षाला धक्का बसला. तसेच दोन अपक्ष उमेदवार राजू महादेव सोलगे, सुशिला दत्तात्रय माळी यांचेही अर्ज अवैध ठरले. चारही विभागीय कार्यालयांतील छाननी प्रक्रियेत एकूण 445 अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज माघारीची अंतिम मुदत 2 जानेवारीपर्यंत असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जुन्या नगरपालिका येथील ‘अ’ विभागीय कार्यालयात दाखल 117 अर्जांपैकी जात प्रमाणपत्र किंवा टोकन नसल्याने 16 ‘ब’ मधील अपक्ष राजू महादेव सोलगे यांचा, तर भाजपकडून उमेदवारी दाखल केली असली, तरी एबी फॉर्म नसल्याने 16 ‘अ’ मधील सुशिला दत्तात्रय माळी यांचा अर्ज अपात्र ठरला. प्रभाग क्र. 13 ‘ड’ मधील भाजपचे उमेदवार रणजित लायकर यांनी अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार विरोधी उमेदवार अमरजित जाधव यांनी केली होती. त्यावर तासभर सुनावणी झाली. सुनावणीत तक्रार फेटाळण्यात आली. भाजपचे रुबन आवळे यांनी थकबाकीवरून विरोधी शिव-शाहू विकास आघाडीचे अबाहम आवळे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला. मात्र, ही हरकतही फेटाळण्यात आली.
राजर्षी शाहू महाराज पुतळा येथील विभागीय कार्यालय ‘ब’ येथे भाजपचे रवी रजपुते यांनी प्रवर्ग बदललेला जातीचा दाखला सादर केला असून त्यांचा अर्ज अवैध ठरवावा, अशी मागणी विरोधी उमेदवार अजय भोरे यांनी केली होती. मात्र, ही मागणी फेटाळण्यात आली. प्रभाग 14 मधील उमा गौड या उमेदवाराने भाजपच्या मेघा भोसले यांच्या अर्जावर हरकत घेतली. मात्र, तीही फेटाळण्यात आली. सरस्वती हायस्कूल येथील कार्यालय ‘क’ येथे अपक्ष उमेदवार रोहन धारवट यांचा जात प्रमाणपत्र किंवा टोकन नसल्याने अर्ज अवैध ठरवण्यात आला. प्रदीप धुत्रे यांनी विरोधी राजेंद्र तळकर यांना तीन अपत्य असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच सर्फराज खलिफा यांच्या अर्जावर शपथपत्रावरून हरकत घेतली होती. मात्र, धुत्रे यांचे दोन्ही आक्षेप फेटाळले. भाजपचे राजू बोंद्रे यांनी शिव-शाहू विकास आघाडीचे नजीर फकीर आणि अपक्ष उमेदवार शशिकांत देसाई यांनी अनधिकृत बांधकाम केल्याची हरकत घेतली. मात्र, दोघांचीही उमेदवारी वैध ठरवण्यात आली.
शहापूर येथील कार्यालय ‘ड’ येथे प्रभाग 7 मधील किरण कांबळे यांचा डमी अर्ज अवैध ठरवण्यात आला. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार दीपाली कांबळे यांच्या उमेदवारीवर अपक्ष उमेदवार आरती बनसोडे यांनी जात प्रमाणपत्रावरून आक्षेप घेतला होता. मात्र, तो फेटाळला. शिव-शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना दिलेल्या एबी फॉर्ममध्ये स्पष्टता नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरवण्याची मागणी भाजप कायदा आघाडीचे ॲड. शिवराज चुडमुंगे यांनी केली.
मात्र, बी फॉर्मवर स्पष्टता असल्याने ही मागणी फेटाळण्यात आली. भाजपच्या शुभांगी माळी यांच्या शपथपत्रावर विरोधी यास्मिन तासगावे, तर मंगल मुसळे यांच्या अर्जावर अतिक्रमणावरून पद्मा सावरतकर यांनी आक्षेप घेतला. मात्र, हे दोन्ही अर्ज वैध ठरवण्यात आले. दिवसभर छाननीसाठी कार्यालयांसमोर उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांची गर्दी होती.