इचलकरंजी : महापालिकेच्या पहिल्या सभागृहात जाण्यासाठी काही प्रभागातून नातेसंबंधातील पती-पत्नी, वडील-मुलगी, वडील-मुलगा, काका-पुतणी यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. मात्र एका कुटुंबातील पती, पत्नी तर एका प्रभागातून वडील निवडून आले. त्यामुळे ‘कहीं खुशी, कहीं गम’.. अशी स्थिती अनुभवण्यास मिळाली.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रभाग क्रमांक 3 ड मधून माजी आ. अशोकराव जांभळे व 2 ड मधून सुहास जांभळे यांनी निवडणूक लढवली. मतदारांनी त्यांच्यावर पुन्हा जबाबदारी सोपवली आहे. मात्र सुहास जांभळे यांना अपयश आले. शिव-शाहू आघाडीकडून प्रभाग 7 अ मधून क्रांती आवळे तर प्रभाग 9 अ मधून माजी नगरसेवक अब—ाहम आवळे हे पती-पत्नी रिंगणात होते. यामध्ये क्रांती आवळे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली. त्यांना पहिल्याच प्रयत्नात यश आले.
प्रभाग 8 क मधून माजी सभापती संजय तेलनाडे, 16 क मधून त्यांच्या पत्नी स्मिता तेलनाडे हे निवडणूक लढवत होते. या दोघांनीही विजय मिळवला. नवीन सभागृहात तेलनाडे एकमेव पती-पत्नी असणार आहेत. प्रभाग 16 इ मधून संजय तेलनाडे यांचे बंधू माजी नगरसेवक सुनील तेलनाडे यांनीही बाजी मारल्याने एकाच कुटुंबातील तीन सदस्यांची एंट्री झाली आहे.
शिव-शाहू विकास आघाडीने प्रभाग 9 ब मधून माजी उपनगराध्यक्ष संजय कांबळे यांची मुलगी संतोषी कांबळे तर तर प्रभाग 12 अ मधून संजय कांबळे यांनी निवडणूक लढवली. या दोघांनाही पराभव सहन करावा लागला. प्रभाग 12 ड मधून माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे तर 14 ब मधून त्यांची पुतणी रागिणी मोरबाळे रिंगणात होती. या दोघांचाही पराभव झाला. शिव-शाहू आघाडीकडून प्रभाग 13 ड मधून माजी नगरसेवक अमर जाधव तर 16 अ मधून त्यांच्या पत्नी मंजुश्री जाधव रिंगणात होते. अमर जाधव यांनी बाजी मारली. मात्र मंजुश्री यांना अपयश आले.
माजी नगराध्यक्षांच्या मुलीला पराभवाचा धक्का
माजी नगराध्यक्षा मेघा चाळके व माजी नगरसेवक सागर चाळके यांचे महापालिका राजकारणात निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. त्यांच्या प्रभागातून त्यांनी सातत्याने विजय संपादन केला आहे. या निवडणुकीत चाळके यांनी सक्रिय राजकारणातून बाजूला होत मुलगी हिमानी चाळके यांना संधी दिली होती. मात्र विजयापर्यंत पोहोचवण्यात त्यांना यश आले नाही.
76 जागांच्या सभागृहात महायुतीची एकहाती मुसंडी : 47 जागांवर विजय मिळवत महायुतीने सत्तेवर शिक्कामोर्तब केले.
शिव-शाहू विकास आघाडीची मर्यादित कामगिरी : 65 जागा लढवून केवळ 17 जागांवर समाधान
अपक्षांना मतदारांचा नकार : 59 अपक्ष उमेदवार रिंगणात असूनही एकालाही यश नाही.
27 माजी नगरसेवकांचे पुनरागमन : पहिल्या महापालिकेत सर्वच आघाडीतून 27 माजी नगरसेवकांनी विजय मिळविला.