Ichalkaranji municipal | महापालिका समिती सभापतीसह स्वीकृत सदस्यांसाठी मोर्चेबांधणी  
कोल्हापूर

Ichalkaranji municipal | महापालिका समिती सभापतीसह स्वीकृत सदस्यांसाठी मोर्चेबांधणी

इच्छुकांची संख्या अधिक; नेत्यांच्या नेतृत्वाची कसोटी

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : महापालिका निवडणुकीचा धुरळा खाली बसला असून भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महापौर, उपमहापौरपदाच्या निवडीही विनासायास पार पडल्या आहेत. आता विविध विषय समिती सदस्यांसह स्वीकृत नगरसेवक निवडीचे वेध सर्वांना लागले आहेत. यासाठी राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. निवडणुकीत इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नेत्यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करीत अनेक इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुकांच्या संख्येमुळे नेत्यांचीही निवडीसाठी दमछाक होणार आहे.

इचलकरंजी महापालिकेसाठी 16 प्रभागांतून 65 सदस्य निवडून आले आहेत. भाजप महायुतीचे संख्याबळ 47 असून विरोधी शिव-शाहू विकास आघाडीचे संख्याबळ 17 आहे. शिवसेना उबाठा गटाचा एक सदस्य आहे. चार वर्षांनंतर आणि महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या अधिक होती. त्यातून उमेदवारी देताना अनेकांना नेत्यांनी स्वीकृतचा शब्द दिला होता. महापौर, उपमहापौर निवडीनंतर आता 20 फेब—ुवारी रोजी स्वीकृतसह विषय समित्यांच्या सदस्यांच्या निवडीसाठी सभा होणार आहे.

अधिनियमातील तरतुदीनुसार भाजप महायुतीच्या वाट्याला चार, तर शिव-शाहू आघाडीला दोन स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करता येणार आहे. या जागांसाठी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून पक्षश्रेष्ठींकडे जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आम्ही प्रामाणिक काम केल्याचा दाखला देत अनेकांनी स्वीकृती सदस्य पदावर दावा केल्याने नेत्यांचीही डोकेदुखी वाढली आहे. स्वीकृत पाठोपाठ महापालिकेच्या विविध विषय समिती सदस्यांच्या निवडीही सभेत होणार आहेत. महापौर, उपमहापौर यापाठोपाठ महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समितीत आपला सहभाग असावा, यासाठीही अनेकांनी नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. अन्य विषय समित्यांमध्ये आणि विशेषत: विषय समित्यांच्या सभापतिपदी आपलीच वर्णी लागावी, यासाठीही अनेकजण प्रयत्नशील आहेत. स्वीकृतसह स्थायी व विषय समित्यांच्या यादीत नेमके कुणाला स्थान मिळणार, याची उत्सुकताही शहरवासीयांना लागली आहे.

नेत्यांच्या ‘शब्दा’ची आठवण : निवडणुकीवेळी उमेदवारी न मिळालेल्या अनेक दिग्गजांना नेत्यांनी मस्वीकृतफचे आश्वासन दिले होते. आता त्या शब्दाची आठवण करून देत इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

राजकीय पुनर्वसन की तज्ज्ञांना संधी?: महापालिकेत एकूण 6 जागा स्वीकृत सदस्यांच्या आहेत. यामध्ये भाजप महायुतीच्या वाट्याला 4 तर शिवशाहू आघाडीला 2 जागा मिळणार आहेत. या जागांवर निष्ठावंतांचे पुनर्वसन होणार की खर्‍या तज्ज्ञांना संधी मिळणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

स्थायी आणि विषय समित्यांसाठी फिल्डिंग: केवळ स्वीकृतच नव्हे, तर ‘स्थायी समिती’ आणि इतर महत्त्वाच्या विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी नवनिर्वाचित नगरसेवकांनी आतापासूनच नेत्यांकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे.

प्रभाग समित्यांचे नवे समीकरण: महापालिका अधिनियमानुसार आता प्रभाग समित्यांचीही स्थापना होणार आहे. या समित्यांवर अशासकीय सदस्य म्हणून कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT